Bramayugam trailer video : काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे अॅक्शन आणि मनोरंजनाचा भरणा असंच समीरकण तयार झालं होतं, पण नव्या जोमाच्या दिग्दर्शकांनी मात्र ही संकल्पनाच पूर्णपणे बदलून दमदार कथानक, छायांकन, साजेसं पार्श्वसंगीत आणि तगडी स्टारकास्ट अशा घटकांवर लक्ष देत एकाहून एक दर्जेदार चित्रपट साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. अशाच या दाक्षिणात्य चित्रपट जगतात साकारण्यात आलेल्या आणि विविधभाषी प्रेक्षकांमध्येही कमालीचा प्रसिद्ध असणारा एक चित्रपट म्हणजे 'कांतारा'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक लोकसंस्कृतीशी संबंधित एक विषय घेत शक्य तितक्या स्थानिक संस्कृतीची झलक दाखवत दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि या कलाविष्कारानं बॉक्स ऑफिसवरचे असंख्य विक्रम मोडले. थरकाप उडवणाऱ्या याच चित्रपटाला टक्कर देईल असा आणि त्याहूनही अधिक प्रमाणात घाबरवणारा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला ही बाब लगेचच लक्षात येईल. 


हेसुद्धा वाचा : Atal Setu News : चाललंय काय? 'अटल सेतू’वरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई 


15 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दोन दिवसांमध्येच कमालीची पसंती मिळताना दिसत आहे. 'भ्रमयुगम' असं या चित्रपटाचं नाव असून, ज्येष्ठ अभिनेते ममूथी यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका पाहायला मिळत आहे. स्थानिक भाषांमध्ये असतानाही हा चित्रपट आता कमाईचा डोंगर रचताना दिसत आहे. 



एका थरारक खेळावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना त्यामध्ये दिसणारी दृश्य, घटनांचं छायाचित्रण आणि धडकी भरवणारे आवाज हे सारंकाही चित्रपटाची उत्सुकता ताणून धरत आहे. राहुल सदाशिवच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या या चित्रपटाचं कथानक केरळातील काही घटकांवर भाष्य करतं. या चित्रपपटामध्ये ममूथी (mammootty), अर्जुन अशोकन, सिर्धार्थ भारतन, अमाल्डा लिड आणि सहकलाकारांचा अभिनय पाहायला मिळत आहे. एका चांगल्या कथानकाची जोड, त्यावर कलाकारांच्या अभिनयाची मिळणारी साथ पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट 30 कोटींच्या कामाईकडे झेपावू शकतो असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं वीकेंडला एखादा चांगला चित्रपट पाहण्याच्या बेतात असाल तर, 'भ्रमयुगम' हा पैसा वसूल पर्याय ठरू शकतो.