मुंबई : लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी शिकवल्या जातात. किंवा आपण, ज्या वर्तुळात वावरतो त्या माध्यमातून या गोष्टी ओघाओघाने आपल्याला उमगतात. याच गोष्टी मनावर अशा काही बिंबवल्या जातात ज्याचा विसर आपल्याला पडत नाही. असं असलं तरीही एक बी टाऊन अभिनेत्रीला मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीचाच विसर पडला आहे. साऱ्या देशासमोर एका सोप्या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकलेली नाही. ज्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. कित्येकांनी तर तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामायण नावाच्याच बंगल्यात राहणाऱ्या या अभिनेत्रीला रामायणाशीच संबंधीत एक सोपा प्रश्न विचारण्यात आला, ज्याचं उत्तर काही तिला देता आलेलं नाही. ही तर दुसरी आलिया, असं म्हणत खिल्ली उडवली जाणारी अभिनेत्री आहे, शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा. 


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमादरम्यान राजस्थानच्या बाडमेर येथील रुमा देवी यांच्यासह सोनाक्षी या खेळात सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यानच रुमा देवी आणि सोनाक्षीला एक प्रश्न विचारण्यात आला. रामायणानुसार हनुमान कोणासाठी संजीवनी घेऊन गेले होते? हाच तो प्रश्न. 





मुख्य म्हणजे या प्रश्नासाठी त्यांना पर्यायही देण्यात आले होते. सुग्रीव, लक्ष्मण, सीता, राम असे पर्याय त्या दोघींपुढे ठेवण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर देतेवेळी सोनाक्षी आणि रुमा या दोघींनीही सीता या पर्यायाला प्राधान्य दिलं. पण, त्यांना या उत्तराची खात्री नव्हती. ज्यामुळे त्यांनी 'एक्सपर्ट ऍडवाईज' या लाईफलाईनची मदत घेण्याचं ठरवलं. ज्यानंतर या प्रश्नाचं उत्तर लक्ष्मण असल्याचं सांगण्यात आलं. 




लाईफलाईनचा वापर करत या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं खरं. पण, सोनाक्षीला या इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न जमल्यामुळे तिची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली आहे. #YoSonakshiSoDumb हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला होता. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी काही मीम्स पोस्ट करत शॉर्टगन म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांच्या लेकीला धारेवर धरलं.