`या` चित्रपटाची `बाहुबली`वर मात
चित्रपटाच्या यशाची गणितं `बाहुबली`ने बदललेली असली तरीही.....
मुंबई : चित्रपट विश्वात आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे सुरेख चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. चौकटीबाहेरचे विषय, जीवनपट आणि इतरही बऱ्याच विषयांवर भाष्य करणारी कलाकृती साकारण्याताच कलाकारांचा मानस असतो. अशा या कलाविश्वात चित्रपटाच्या वाट्याला येणारी गणित बदलली ती म्हणजे 'बाहुबली' या चित्रपटाने.
एस.एस.राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ज्यामुळे काही विक्रमही बॉक्स ऑफिसवर प्रस्थापित झाले.
भव्यतेची परिसीमा बदलणाऱ्या या चित्रपटाला मात्र आता एका नव्या चित्रपटाने पाठी टाकलं आहे. तो चित्रपट म्हणजे 'सरकर'.
दाक्षिणात्य अभिनेता विजय याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने चक्क 'बाहुबली'ला मागे टाकलं आहे. जवळपास ३००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ३० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दिग्दर्शक ए.आर.मुर्गादोस यांच्या जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमधील पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत सरकारने बाहुबली २ ला मागे टाकलं आहे. येत्या काळात हा चित्रपच सर्वाधिक कमाई करणारा तामिळ चित्रपट ठरेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
'इंडियन एक्सप्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बऱ्याच काळानंतर विजय या अभिनेत्याच्या चित्रपटाचा इतक्या मोठ्या पातळीवर यश मिळत आहे. तामिळनाडूशिवाय शेजारील केरळ, कर्नाटक या राज्यांत आणि परदेशातही या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचं कळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.