मुंबई : मुंबई आणि बॉलिवूड या एका झगमगणाऱ्या विश्वाच्या वेगवेगळ्या आणि अनेकांसाठीच आकर्षक असणाऱ्या बाजू आहेत. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी अनेक कलाकार दररोज या कलाविश्वाचं दार मोठ्या आशेने ठोठावतात. अनेकांना हे दार ठोठावणं फायद्याचं ठरतं तर काहींसाठी हा प्रवास सुरुवातीला चांगला ठरतो तो कालांतराने खाचखळघ्यांच्या वळणवाटांवर जातो. सध्या अशाच एका अभिनेत्याने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. त्या अभिनेत्याचं नाव आहे सवी सिद्धू. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव वाचून हा अभिनेता लक्षात येत नसला, तरीही त्याचा चेहरा पाहून मात्र लगेचच 'अरे.... हा होय', अशीच प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. 'फिल्म कम्पॅनियन हिंदी'कडून त्याच्या या प्रवासाचा खुलासा करण्यात आला. 'ब्लॅक फ्रायडे', 'पटियाला हाऊस', 'गुलाल', (प्रदर्शित होऊ न शकलेला) 'पाँच' या चित्रपटांमध्ये काही महत्त्वाच्या आणि लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकलेल्या सवी यांनी आपल्या कुटुंबापासून दूर राहात चित्रपट जगतात आपली स्वप्न साकार करण्यासाठी फार मेहनत घेतली. पाहता पाहता त्याच्याकडे विविध भूमिकांसाठीचे प्रस्ताव येऊ लागले. पण, नशिबाची साथ मात्र त्यांना नव्हती. 


खुद्द सवी यांनीच याविषयीची माहिती दिली. 'काम कमी नव्हतं.... इथे लोकांना काम मिळत नाही. पण, माझ्याकडे इतकं काम होतं, की कालांतराने मला ते नाकारावं लागलं. माझी प्रकृती खालावत होती. सोबतच आर्थिक परिस्थितीही हळूहळू बिघडत गेली आणि दिवस सरत गेले तसतसं काम संपत गेलं', असं ते म्हणाले. एकिकडे प्रकृती खालावत असतानाच दुसरीकडे कुटुंबातील काही जवळचे सदस्य कायमचे दुरावले जात होते. पत्नी, आई, सासरे अशा जवळच्या व्यक्तींनी या जगाचा निरोप घेतला होता. पाहता पाहता सवी एकटे पडत गेले आणि नियती पूर्ण बदलली. नाईलाजास्तव त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुंबईतील एका सदनिकेमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करण्यास सुरुवात केलं. दिवसाचे १२ तास ते आज या ठिकाणी काम करतात, घड्याळाच्या काट्यांवर त्यांचं आयुष्य धावत आहे. पण, त्यांच्यात दडलेला अभिनेता मात्र आजही त्याच उत्सुकतेने कलाविश्वाच्या त्याच दारांकडे आशेने डोळे लावून आहे, ज्या दारातूनच त्यांना नवी ओळख मिळाली होती. 


आजच्या घडीला आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे चित्रपटांमध्ये काम करण्याऱ्या सवी यांना चित्रपट पाहणंही एका स्वप्नाप्रमाणेच वाटत आहे. येत्या काळात आपण, पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यास तयार असल्याचं म्हणत या कलाविश्वाकडूनही सकारात्मकतेने त्यासाठीची तयारी दाखवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हळूहळू एक-एक अडचण दूर सारणारे सवी यांनी परिस्थितीसाठी कोणालाही दोष न देता, याच परिस्थितीतून डोकं वर काढत जणू आयुष्याकडे पाहण्याता एक हसरा, बोलका आणि तितकाच सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे, असंच म्हणावं लागेल.