`पकडून मारलं पाहिजे!` शाहरुख, अक्षयसह अजय देवगणवर भडकला `शक्तिमान`; म्हणाला, `यांना कठोर शिक्षा...`
Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांनी शाहरुख, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
Mukesh Khanna Angry On Pan Masala Ads: शक्तिमान आणि महाभारत यासारख्या टिव्ही मालिकांमुळं देशातील घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. कधी सोशल मीडिया तर कधी व्लॉग्समधून ते त्यांची मत मांडत असतात. कधी कधी त्यांच्या परखड मतांमुळं ते ट्रोलदेखील होतात. अलीकडेच त्यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर टीका केली आहे. तसंच, पान मसाल्याची जाहिरात करण्यावरुन त्यांनी कलाकारांवर तोफ डागली आहे.
मुकेश खन्ना यांनी बॉलिवूडमधील या तीन बड्या कलाकारांना एक अवाहन केलं आहे. हे कलाकार अशा वस्तुंचे प्रमोशन करताहेत ज्यामुळं लोकांचं नुकसान होतंय. मुकेश खन्ना यांनी बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत बड्या कलाकारांवर तोफ डागली आहे. मला तर असं वाटतंय या कलाकारांना कठोर शिक्षा मिळायला पाहिजे. जर तुम्ही मला विचारलं तर मी इतकंच म्हणेन की यांना पकडून पकडून मारायला पाहिजे. मी त्यांना पण हे म्हटलं आहे. मी स्वतः अक्षय कुमारला पण ओरडलो आहे. हेच लोक आरोग्याची काळजी घ्या असा दावा करतात सभ्यतेबद्दल बोलतात.
मुकेश खन्ना यांनी पुढं म्हटलं आहे की, आता शाहरुख खानदेखील याच मार्गावर आहेत. या जाहिरातींवर कोटी रुपये खर्च होतात. हे लोक नागरिकांना काय शिकवण देताहेत? जरी ते म्हणत असतील की ते पान मसाला नाही तर सुपारी विकत आहेत. पण लोकांना माहितीये त्याचे खरे उद्दिष्ट्य काय आहे.
मुकेश खन्ना यांना विचारण्यात आले की जर तुम्हाला अशा जाहिराती करण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे की, मी कधीच सिगारेट आणि पान मसाल्याच्या जाहिराती केल्या नाहीयेत. या जाहिरातींसाठी खूप पैसे दिले जातात मात्र मी कधीच अशा गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही. मी या मोठ्या कलाकारांनाही विनंती करेन की तुम्ही तुमचे चाहते तुम्हाला आदर्श मानतात ते तुमच्याप्रमाणेच नक्कल करतात. त्यामुळं कृपया अशा गोष्टी करु नका. तुम्ही नाव कमावलं आहे. तेव्हा लोक म्हणतील की, जर ते असं करु शकतात तर आम्हीदेखील करु, असं अवाहन मुकेश खन्ना यांनी केलं आहे. मुकेश खन्ना यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तर युजर्सनादेखील त्यांचा हा मुद्दा पटला आहे.