मुस्लिम शेजारी दिवाळी साजरा करु देत नाहीत, अभिनेत्याचा आरोप
रविवारी दिवाळीची मोठ्या दणक्यात सुरुवात झाली. पण...
मुंबई : रविवारी दिवाळीची मोठ्या दणक्यात सुरुवात झाली. ज्यानंतर सगळीकडेच या सणाचा उत्साह पाहायला मिळाला. असा हा सण साजरा करण्यात सर्वजण मग्न असतानाच एका अभिनेत्याला मात्र भलत्याच प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटच्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेता राहत असलेल्या वसाहतीमध्ये मुस्लिम धर्मीय त्यांना दिवाळी साजरा करु देत नाहीत, अशी तक्रार केली आहे.
विश्वा भानू यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांना शेजाऱ्यांनी दारातील रांगोळी पुसून टाकण्यास आणि दिवे काढून टाकण्यास सांगितलं. 'मालाड, मालवणी येथील एका सोसायटीमध्ये मी राहतो. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही इथे राहणाऱ्या लोकांनी आमचं घर सजवण्यावरुन माझ्या आणि माझ्या पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. घराच्या दारापाशी रांगोळी काढू आणि दिवे लावून देत नव्हते. त्यांनी रोषणाईची नासधूस केली आणि ती काढून टाकण्यासही सांगितलं', असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं.
आपल्याला सामोरं जावं लागत असणाऱ्या या अडचणीविषयी त्याने ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांकडेही मदत मागितली आहे.
'स्पेशल २६', 'मर्दानी' आणि 'रघू रोमियो' अशा चित्रपटांमधून काम करणाऱ्या अभिनेत्यावर अशी वेळ येणं निराशाजनक आहे. मुळात कोणालाही त्यांचे सणवार साजरा करण्यापासून रोखणं यामध्ये भारताची विविधतेत एकता अजिबातच दिसत नाही, अशा प्रतिक्रिया ही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.