Leaders : चित्रपट वर्तुळात अनेक कलाकारांना संघर्षाचे दिवस पाहावे लागले. याच संघर्षाच्या दिवसांतून पुढे आल्यानंतर आता मात्र यापैकी बरीच नावं यशाच्या शिखरावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत. या नावांपैकी एका अभिनेत्यानं खऱ्या अर्थानं आलेल्या प्रत्येक वादळाला झेलत, त्यावर मात करत यश संपादन केलं.


मित्रांच्या साथीची त्याच्या या प्रवासात महत्त्वाची भूमिका होती. अगदी तरुण वयापासून ते आतापर्यंत या अभिनेत्याचं त्याच्या मित्रांशी असणारं नातं दिवसागणिक आणखी घट्ट होत चाललं आहे. हा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी.


चिरतरुण, या एका शब्दात वर्णन करता येण्याजोगा अभिनेता अंकुश चौधरी हा त्याच्या मनमिळाऊ स्वभावासाठी कायमच ओळखला जातो. अंकुशनं आजवर अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेली कित्येक दशकं त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.


किंबहुना आजच्या घडीला तो अनेक तगड्या मराठमोळ्या कलाकारांना टक्करही देत आहे. अंकुश आज इतका लोकप्रिय आहे, की विचारुन सोय नाही. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, आज सुपरस्टार म्हणवणारा हा अभिनेता सुरुवातीच्या काळात अतिशय गरीबीचे दिवस पाहून झाला आहे.


एक वेळ अशीही आली होती जेव्हा अंकुश चौधरीला भाजीपालाही विकावा लागला होता. पण, या कामाकडेही त्यानं आदरानं पाहिलं आणि त्यात झोकून दिलं. दिवस पालटले, सुरुवातीला एकांकिका स्पर्धा, नाटक पुढे मालिका आणि मग आता चित्रपट अशी वाटचाल त्यानं टप्प्याटप्प्यानं केली.


आजच्या घडीला अंकुश चौधरी मराठी कलाविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. एका वेळी एकाच प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करण्याचा आणि त्यात स्वत:ला झोकून देण्याचा त्याचा कायमच प्रयत्न असतो.



भरत जाधव, केदार शिंदे, आदेश बांदेकर या कलाकारांशी असणारी त्याची मैत्री आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाची साक्षीदार ठरली. बऱ्याच कार्यक्रमांना या मित्रांनी एकत्र हजेरी लावली आणि मैत्रीचे दाखलेही दिले. असा हा अंकुश खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट जगतातील ‘यारों का यार’ आहे असं म्हणायला हरकत नाही.