राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार
राज्य सरकारकडून ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तर लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त खडीकर लिखित `मोठी तिची सावली` या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
मुंबई : राज्य सरकारकडून ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तर लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार राम लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकाराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी हा पुरस्कार पुष्पा पागधरे, माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना देण्यात आला आहे.
राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश केला. पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम-लक्ष्मण म्हणून. राम-लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत.
मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.