`नादिया के पार` फेम ही प्रसिद्ध अभिनेत्री आईसीयू मध्ये भर्ती
या अभिनेत्रीच्या मदतीसाठी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.
मुंबई : 'नादिया के पार' चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सविता बजाज यांची आर्थिक परिस्थिती बिघडल्याची बातमी समोर आली होती. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नाही आहेत. सविता बजाज यांनीही लोकांकडे मदतीसाठी आवाहन केलं होतं. आता त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येत आहे आणि आता त्यांवा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सविता बजाज यांची ही बातमी अभिनेत्री नुपूर अलंकारने दिली आहे.
नुपूर अलंकार यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "सविता बजाजची प्रकृती आता सुधारत आहे, पण त्या अजूनही आयसीयूमध्येच आहेत आणि डॉक्टर त्यांच्यावर सध्या उपचार करत आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
"नुपूर अलंकार पुढे म्हणाली, "सविता बजाज ज्या खोलीत राहतात त्या खोलीला खिडकी नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. वृद्धाश्रमातही मी त्यांच्या विषयी बोलले होते, पण त्यांना तिथेही जागा मिळाली नाही."
सविता बजाज यांच्या या बातमीनंतर सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. सचिनने सविता यांच्यासोबत 'नादिया के पार' चित्रपटात काम केलं होतं. सविता यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.