Namarta Sambherao on Lalbag : उद्या अनंत चतुर्थी बाप्पा आपल्या घरी जाणार. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हाच आपल्याला दु:खाची जाणीव होते की आता अखेर बाप्पा घरी जाणार आहेत. बाप्पा जाताना आपल्याला आपल्या त्या सगळ्या गोष्टी आठवतात ज्या आपण त्या 10 दिवसात करतो. कारण या दहा दिवसात आपण अनेक गणपती मंडपांना भेट देतो. यावेळी देखील आपल्या लहाणपणीच्या सगळ्या आठवणी आपल्याला आठवतात. असंच काहीसं महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील नम्रता संभेरावसोबत झालं आहे. नम्रतानं नुकतीच 'झी 24 तासला' मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नम्रतानं तिच्या लहाणपणीच्या लालबागच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत नम्रताला प्रश्न विचारण्यात आला की तू लालबागकर आहेस, तर तुझ्या लहाणपणीच्या आठवणी काय आहेत. त्यासोबत आता आणि तेव्हाच्या गणेशोत्सवात काय फरक आहे? या वेळी उत्तर देत नम्रता म्हणाली, 'खूप फरक आहे. मी लालबागची आहे. लालबाग आणि काळाचौकीच्या बॉर्डरवर राहते. लालबागचा राजा बसतो तिथे अगदीच मागच्या गल्लीत मी राहते. माझं माहेर अजूनही तिथेच आहे.  मला खूप भारी वाटतं. लालबाग मार्केटला गणेशोत्सवात तुम्ही कधीही जा, कितीही वाजता जा, पहाटे तीन-चार वाजता. तिथे कळतच नाही मध्य रात्र, सकाळ की दुपार आहे किंवा किती वाजलेत काहीच कळत नाही. आपण इतकं भान हरपून जातो गणेशोत्सवात की मला स्वत: ला अभिमान वाटतो की मी या भागात वाढलेली आहे.' 


हेही वाचा : VIDEO : बोमन इराणी यांनी नम्रता संभेरावला दिली लिफ्ट, अभिनय पाहुण म्हणाले...


पुढे नम्रता म्हणाली, 'लालबागच्या राज्याला मी देखील लहाणपणी रांगेत उभं राहुन दर्शन घेतलं. आज मी व्हीव्हीआयपीमधून दर्शन घेतलं. हा एकच फरक आहे.' नम्रताचं हे बोलणं ऐकताच पुढे प्रसाद खांडेकर बोलताना दिसतो की 'माहेरवाशीन आज जवळ-जवळ इथून नाही रे, इथून राईटला जा तुम्ही. ती आमची मॉनिटर झाली होती.' त्यावर उत्तर देत नम्रता म्हणते की 'आपल्या एरियात आल्यावर एक उत्साह असतोना. पण, एक-दोन ठिकाणी माझा पचका झाला. कारण गणेशोत्सव मंडळानं एवढ्या एन्ट्रीज करून ठेवल्या आहेत की कुठून कुठून या गल्लीतून, त्या गल्लीतून. मग माझं असं झालं की अरे अच्छा इथून आहे का? सॉरी सॉरी. मग मध्येच प्रसादनं मला एक टोमना पण मारला की तू नक्की इथेच रहायचीस ना. गणेशोत्सवाचं वातावरण मला नेहमी आवडतं. या दहा दिवसात कुठूण उत्साह येतो. नाहीतर इतर वेळी आपण इतके व्यग्र असतो की आपल्याला कुठे जायला कंटाळ येतो. हात-पाय दुखतात. झोपावसं वाटतं. आराम करावासा वाटतो. पण अशा वेळी रात्रीचे तीन वाजले असतील तरी लोक रांगेत उभे असतात. कारण बाप्पाच्या चरणी त्यांना त्यांचं मस्तक ठेवायचं असतं. बाप्पाकडे प्रार्थना करायची असते. अनेकांना नवस बोलायचे असतात, नवस फेडायचे असतात. ही एवढी उर्जा ही फक्त गणपती बाप्पाच देतो आपल्याला असं मला वाटतं. त्यामुळे या परिसरात मी वाढली याचा मला अभिमान आहे.' 



नम्रताच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यावेळी नम्रतासोबत हास्यजत्रेतील अनेक कलाकार दिसणार आहेत. तर प्रसाद खांडेकर चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.