मुंबई : कलाविश्वात मिळालेलं यश टीकवत प्रदीर्घ काळासाठी या जगतात आपलं स्थान भक्कम करणारी नावं तशी मोजकीच. या नावांची यादी अनेकांच्या स्मरणात असली तरीही याच कलाविश्वाला अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या काही चेहऱ्यांचा सर्वांनाच विसर पडला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. झगमगणाऱ्या या दुनियेतील असाच एक चेहरा सध्या नशीब आणि परिस्थितीच्या खेळीत असा काही फसला आहे, की त्यांच्यापर्यंत कोणाची मदतही पोहोचू शकलेली नाही. हा चेहरा म्हणजे ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंद निहलानींच्या १९८८ 'तमस' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या वनराज भाटिया यांना मोठ्या आर्थिक संकटाचा फायदा करावा  लागत असल्याची निराशाजनक बाब आता समोर आली आहे. 'मुंबई मिरर'शी संवाद साधताना खुद्द भाटीया यांनीच याविषयीची माहिती दिली. 


'माझ्याकडे काहीच पैसे नसून, माझ्या बँक खात्यात एकही रुपया शिल्लक नाही', असं ते म्हणाले. स्मृती कमकुवत झाल्यामुळे आणि बळावलेल्या काही शारीरिक व्याधींमुळेही त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत आहे. भाटिया यांना इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण भासू लागली आहे की, त्यांना घरातील महागड्या वस्तू, भांडीही विकावी लागत आहेत. 


गेल्या बऱ्याच काळापासून भाटीया यांची वैद्यकीय तपासणी न झाल्यामुळेही त्यांच्या प्रकृतीविषयी फार माहिती समोर येणं शक्य होत नसल्याचं कळत आहे. एकेकाळी कलाविश्वात यशशिखरावर असणाऱ्या आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या भाटिया यांची सद्यस्थिती पाहता त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 



वनराज भाटिया यांच्या कामाविषयी सांगावं तर, कुंदन  शहांच्या 'जाने भी दो यारो', अपर्णा सेन यांच्या '३६ चौरिंघी लेन' आणि प्रकाश झा यांच्या 'हिप हिप हुर्रे...', या चित्रपटांचा समावेश आहे. 'अंकुर' आणि 'सरदारी बेगम' या चित्रपटांपासून तर ते श्याम बेनेगल यांच्या आवडीच्या कलाकारांपैकी एक ठरले. त्यांनी 'मंथन', 'जुनून', 'कलयुग', 'मंडी', 'त्रिकाल' आणि 'सूरज का सातवां घोडा' या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. १९८९ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. भाटिया यांनी लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक येथे वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचं शिक्षण घेतलं होतं.