रंगभूमीचा `नटसम्राट` हरपला, श्रीराम लागू यांच्या निधनानं ट्विटरवर हळहळ
मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांचं मंगळवारी रात्री ८.३० वाजल्याच्या सुमारास निधन झालंय. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं श्रीराम लागू हे त्यांच्या राहत्या घरीच कोसळले होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नी दीपा लागू आणि मुलगा आहे. डॉ. लागू यांचा मुलगा गुरुवारी सकाळी अमेरिकेतून पुण्यात पोहचेल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील, असं दीपा लागू यांच्यावतीनं सांगितलं गेलंय. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. डॉ. लागू यांच्या निधनानं कलाक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होतेय.
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलीय तर राष्ट्रवादीचे खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही 'सूर्य पाहिलेला माणूस' काळाच्या पडद्याआड गेला असं म्हणत श्रीराम लागू यांना आदरांजली व्यक्त केलीय.
....म्हणून स्वत:ला चोर म्हणायचे डॉ. लागू
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय. तर आपण एका हरहुन्नरी व्यक्तीमत्वाला गमावून बसल्याचं भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.
भाजप नेत्यांसोबतच महाराष्ट्र काँग्रेसनंही डॉ. श्रीराम लागू यांना आदरांजली व्यक्त केलीय.
श्रीराम लागू दीर्घकाळापासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
१६ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेल्या डॉ. लागू यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. ते एक ईएनटी सर्जन (ENT Surgeon) होते. डॉ. लागू यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखलं जातं.