मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा 'ठाकरे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अभिजीत पानसे दिग्दर्शित या चित्रपटातून बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला आहे. अतिशय उत्साह आणि कुतूहलपूर्ण वातावरणात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाच्या वाटेत आता मात्र एक अडथळा आला आहे. तो अडथळा म्हणजे चित्रपट लीक होण्याचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चित्रपटांच्या पायरसीमुळे गेल्या काही वर्षांपासून दिग्दर्शक, निर्माते आणि साऱ्या कलाविश्वापुढे अडचण होऊन उभ्या ठाकलेल्या 'तमिळरॉकर्स' या वेबसाईटवर ठाकरे लीक झाला आहे. चित्रपटाची संपूर्ण फीत ही टोरंटवरही उपलब्ध असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे येण्यापूर्वीच 'ठाकरे'चा रथ एका अर्थी पायरसीने रोखला, असं म्हणावं लागेल. 


फक्त हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमधील इतर चित्रपटही या वेबसाईटवर लीक झाले असून, त्याचा फटका चित्रपटाला बसतो. सुरुवातीला तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड असे चित्रपट या वेबसाईटवर लीक होत होते. ज्यामागोमाग हिंदी आणि इंग्रजी चित्रपटही यावर लीक होऊ लागले आणि कलाविश्वाची डोकेदुखी वाढली. वारंवार डोमेन बदलत असल्यामुळे या वेबसाईटला आळा घालणं ही महत्त्वाची समस्या झाली आहे. 


फक्त ठाकरेच नव्हे, तर याआधी प्रदर्शित झालेल्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक', 'व्हाय चीट इंडिया', 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर', 'सिम्बा', 'झिरो', '२.०', 'पेटा' हे चित्रपटही या साईटवर लीक झाले होते. चित्रपटांचं लीक होण्याचं वाढतं प्रमाण पाहता माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आल्याचं कळत आहे. ज्यामध्ये कायद्याच्या मदतीने चित्रपट लीक करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे. पायरसीचं हे संकट टाळण्यासाठी वेळ लागणार हे निश्चित, पण, तोपर्यंत कलाकारांची मेहनत आणि चित्रपटाच्या प्रदर्शनावर, त्याच्या कमाईच्या आकड्यांवर मात्र या साऱ्याचा परिणाम होत राहणार हेसुद्धा एक कटू सत्य आहे.