करणच्या चित्रपटात रणवीरसोबत रोमान्स करणार ‘ही’ अभिनेत्री
या दोघांचीही विभिन्न अभिनयशैली पाहता आता त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहर याने त्याच्या मल्टीस्टारर चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली. ‘तख्त’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव. एका ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटाची स्टरकास्टही करणने सर्वांच्या भेटीला आणली होती. आलिया भट्ट, जान्हवी कपूर, करिना कपूर खान, रणवीर सिंह, भूमी पेडणेकर, विकी कौशल या कलाकारांची करणच्या या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये वर्णी लागली.
तेव्हापासूनच अनेकांनी या चित्रपच्या कथानकाविषयी तर्क लावण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला या चित्रपटाविषयीची एक महत्त्वाची चर्चा समोर येत आहे. ती चर्चा म्हणजे चित्रपटात कोणता कलाकार कोणासोबत स्क्रीन शेअर करणार याविषयीची.
‘बॉलिवूड लाईफ’च्या वृत्तानुसार या चित्रपटात ‘धडक’ फेम अभिनेत्री जान्हवी कपूर ही रणवीर सिंहसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
आलिया भट्ट, करिना कपूर खान, भूमी पेडणेकर या अभिनेत्री असूनही रणवीरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी जान्हवीला प्राधान्य देण्यात आल्याचं कळत आहे.
जान्हवी आणि रणवीर या दोघांचीही विभिन्न अभिनयशैली पाहता आता त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जान्हवीसाठी हा चित्रपट तिच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संधी ठरणार आहे. आपल्याहून जास्त अनुभवी कलाकारांचं मार्गदर्शनही तिला लाभणार आहे. त्यामुळे आता या संधीचं सोनं करण्यात ती यशस्वी ठरते का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.