मुंबई : 'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है...', असं म्हणणारा गणेश गायतोंडे प्रेक्षकांच्या मनात चांगलाच घर करुन आहे. नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजच्या निमित्ताने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गणेश गायतोंडेच्या रुपात सर्वांच्या भेटीला आला आणि त्याचा हा अंदात पाहता पाहता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. पहिल्या पर्वाच्या यशानंतर याच वेब सीरिजचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्याविषयी खुद्द नवाजनेच एक मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिड डे'शी संवाद साधताना त्याने हा खुलासा केला. ''सेक्रेड गेम्सचं नवं पर्व हे पहिल्याच्याही वरचढ असेल. 'बाप' असेल'', असं तो म्हणाला. ज्या लोकांना गणेश गायतोंडे कोण आहे याची माहिती आहे, तेसुद्धा त्याच्याकडून नेमकी कोणती अपेक्षा करावी या पेचात असतात, असं म्हणत त्याने पुन्हा एकदा आपण साकारत असलेल्या व्यक्तीरेखेची थोडक्यात माहिती दिली. 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या पर्वाचं चित्रीकरण केन्यातील मोंबासा, केप टाऊन आणि जोहानसबर्ग येथे करण्यात आलं असल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. 


यंदाच्या वर्षी 'सेक्रेड गेम्स'चं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सीरिजप्रती प्रेक्षकांच्या अपेक्षा पाहता त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला असल्याचंही नवाज म्हणाला. रोममध्ये चित्रीकरण्याच्या वेळी काही चाहते त्याचा फोटो घेण्यासाठी येत असत. त्यावेळी 'सेक्रेड....'चं पहिलं पर्व प्रदर्शित होऊन अवघा एक आठवडा लोटला होता. इतकच नव्हे तर सोशल मीडियावर व्हायरल झालेले असंख्य मीम्सही नवाजच्या टीमने त्याच्यापर्यंत पोहोचवले होते. 



सध्या या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या शेवटच्या काही भागांचं चित्रीकरण मुंबईत सुरु असून, जवळपास एक आठवडाभर हे चित्रीकरण चालणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे या खेळाच्या नव्या पर्वाक़डे आणि उलगडत जाणाऱ्या नव्या रहस्यांकडे.