मुंबई : 'सर्वसक्तीसाली... गणेश गायतोंडे' असं कोणी म्हणालं की लगेचच आठवण होते ती म्हणजे साधारम वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या एका अफलातून वेब सीरिजची. ती वेब सीरिज म्हणजे सेक्रेड गेम्स. एका वेगळ्या दुनियेत नेणाऱ्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. जितेंद्र जोशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे, कुब्रा सैत यांच्या अभिनयातून साकारलेल्या या वेब सीरिजमधील प्रत्येक कलाकार खऱ्या अर्थाने आपली अशी वेगळी छाप पाडून गेला. हीच वेब सीरिज आता एका नव्या अंदाजात नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी 'सेक्रेड गेम्स'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासूनच या दुसऱ्या पर्वाविषयीची उत्सुकता सिगेला पोहोचली. त्यामागोमाग आता 'नेटफ्लिक्स' इंडियाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली आहे. 'कॅलेंडर निकाल, तारीख लिख ले.... चौदा दिन में कुछ बडा होनेवाला है', असं लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या अनेकांचं कुतूहल वाढवत आहे. मुळात ही पोस्ट कशासंदर्भात आहे, यावरुन नेटफ्लिक्स इंडियाने पडदा उचललेला नाही. पण, चाहत्यांनी याचा तर्क काही अंशी बरोबरच लावला आहे, असं म्हणायला हरकत नाही. 




'इस बार क्या होगा भगवान भी नही जानता....' ही ओळही या पोस्टमध्ये लिहिण्यात आली आहे. त्यामुळे सेक्रेड गेम्सचं दुसरं पर्व खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी परवणीच ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दिकीने या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वाविषयी माहिती देत हे नवं पर्व पहिल्या पर्वापेक्षाही मोठं असेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हे बापपण नेमकं काय असणार आहे आणि दिग्दर्शक, लेखक, कलाकारांची फौज नेमका कोणता नजराणा सर्वांच्या भेटीला आणणार आहेत, याची उत्सुकता शिगेला आहे.