मुंबई: वेब सीरिज विश्वात एक वेगळच वळण आणणाऱ्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. नेटफ्लिक्सकडून काही सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करत ही घोषणा करण्यात आली. ज्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. या वेब सीरिजच्या निमित्ताने बी- टाऊन कलाकार, सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांचीही वेगळी रुपं पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘सेक्रेड गेम्स’मधील प्रत्येक पात्राने आपली ओळख प्रस्थापित केली. पण, त्यातही विशेष गाजला तो म्हणजे ‘गणेश गायतोंडे’. अर्थात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी.


नवाजने मोठ्या ताकदीने ‘गणेश गायतोंडे’ हे पात्र साकारलं आणि पाहता पाहता त्याला प्रेक्षकांनीही आपलंसं केलं.


आपण साकारलेल्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद पाहता आता ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या भागासाठी त्याने माधनाचा आकडा वाढवल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.


‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार ‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या भागासाठी सैफ अली खान आणि नवाज या दोघांनाही एकसारंख मानधन देण्यात आलं होतं.


पण, आता दुसऱ्या भागासाठी मात्र नवाजने पहिल्या भागाच्या दुप्पट आकडा मानधनाच्या स्वरुपात मागितला आहे.


नवाजची त्याच्या भूमिकेवर असणारी पकड पाहता निर्मात्यांनीही त्याची ही अट मान्य केली असून, आता त्याला नेमकं किती मानधन मिळालं आहे, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.