मुंबई : 'मेरा वचन ही है शासन...' असं म्हणणारी 'राजमाता शिवगामी' आठवत आहे का? एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'बाहुबली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवून गेलेलं हे पात्रं. 'शिवगामी देवी'च्या पात्राला मिळलेली हीच लोकप्रियता पाहता 'नेटफ्लिक्स'वर आता' बाहुबली'च्या प्रीक्वेलची वेब सीरिज 'बाहुबली- बिफोर द बिगीनिंग' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीक्वेलमध्ये बहुतांश भाग हा 'शिवगामी'च्याच पात्रावर केंद्रित असून एक वेगळीच आणि भव्य कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


'बाहुबली' या चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या वाट्याला आलेलं यश आणि एकंदरच त्याची डोळे दीपवणारी भव्यता पाहता हा स्तर वेब सीरिजमध्ये कायम राखला जाणार का हा प्रश्न सध्या अनेकांच्याच मनात घर करत आहे. त्याशिवाय या वेब सीरिजमध्ये असणाऱ्या पात्रांसाठी तितक्याच तगड्या कलाकारांची निवड करण्यात आल्याचंही कळत आहे. 


अभिनेत्री मृणाल ठाकूर यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत म्हणजेच 'शिवगामी'च्या रुपात झळकणार आहे. त्याशिवाय अभिनेता राहुल बोस, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ अरोरा, अनुप सोनी ही कलाकार मंडळीही वेब सीरिजमधून झळकणार आहेत. 


आनंद नीलकंठन यांच्या 'द राइज ऑफ शिवगामी' या कादंबरीवर या वेब सीरिजचं कथानक आधारित असणार आहे. ज्या माध्यमातून शासन करणाऱ्या 'शिवगामी'चे बरेच पैलू पाहता येणार आहेत.