मुंबई : अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) आदिपुरूष (Adipurush) सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या सिनेमात सैफच्या रावण (Ravan) लूकवर नेटीझन्समधून संतापाची लाट उसळलीय. तर हिंदुत्ववादी संघटनांनीही या लूकवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आदिपुरूष सिनेमाच्या ट्रेलरवरून सोशल मीडियात (Social Media) संतापाची लाट उसळली. यामागे कारण आहे सैफ अली खानचा रावण लूक. (netizens angry actor saif ali khan ravan look in upcoming film Adipurush) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिपुरूष सिनेमात सैफ अली खानला चक्क मुस्लीम धर्मांध रूपात दाखवण्यात आल्यानं हिंदुत्ववादी संघटनांमधून संताप व्यक्त होतोय. रामायणात रावण राक्षसाच्या रूपात असला तरी तो विद्वान, शिवभक्त आणि ब्राह्मण असल्याचं म्हंटलं. मात्र आगामी आदिपुरूष सिनेमात रावणाचा लुक जवळजवळ अल्लाउद्दीन खिलजीशी मिळताजुळता असल्याची टीका केली जातेय. 


रावणाला मुस्लीम वेशात दाखवणं, डोळयांमध्ये सुरमा लावणं, त्याला दाढी असलेलं दाखवणं. असे प्रकार करून त्याचं विद्रुपीकरण केल्याचा हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप आहे. इतकच नाही तर या सिनेमात दाढी असलेला पण मिशा नसलेला हनुमान दाखवून निर्माता-दिग्दर्शकांना नक्की काय दाखवायचंय हा सवालही उपस्थित होतोय. हिंदू महासभेनं या सिनेमावर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 


याआधी तानाजी सिनेमातील उदयभान राजपूत असतानाही त्याला मुस्लीम लूक देण्यात आल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यात आता सैफचा रावणही वादात सापडलाय. विशेष म्हणजे आदिपुरूषचं दिग्दर्शन ओम राऊत या मराठी दिग्दर्शकानं केलंय. त्यामुळे ओम राऊतवरही नेटीझन्सनी जोरदार निशाणा साधलाय. सिनेमाच्या प्रमोशनसाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केले जातायेत का? असाही सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.