मुंबई : महाराष्ट्राला सहकार उद्योगाची मोठी परंपरा लाभली आहे. स्वातंत्रोत्तर काळात राज्याच्या विविध भागात अनेक सहकारी प्रकल्प उभे राहिले. त्यातील काही यशस्वी झाले तर काही काळाच्या ओघात बंद पडले. तरुणांना हाताला काम नाही म्हणून आपलं घरदार आणि गाव सोडून शहराकडे पायपीट करावी लागली. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून आले. याचच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे खान्देशातील चाळीसगावचा ‘बेलगंगा’ साखर कारखाना. एके काळी तालुक्याला मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारा, शेतकऱ्यांना उसाच्या नकदी पिकापासून उत्पन्न मिळवून देणारा हा प्रकल्प, बघता बघता बंद पडला आणि जणू तालुक्याच्या विकासालाच घरघर लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली पंधरा वर्ष बंद पडलेल्या साखर कारखाण्याला चालू करण्याचे स्वप्न एका तरुणाने पाहिले आणि लोकसहभागातून हा साखर कारखाना पुन्हा एकदा चालू करून दाखवला. अर्थात, हा प्रवास वाटतो तितका सोपा निश्चितच न्हवता. तालुक्यातील शेतकरी, कामगार आणि व्यावसायिकांना एकत्र करत चित्रसेन पाटील या तरुण तडफदार व्यावसायिकाने (इंजिनियरने) आपले सर्वस्व पणाला लावत लोकसहभागातून 70 कोटी रुपये उभे केले. जिल्हा बँकेचे कर्ज असेल किंवा प्रशासनातील कागदपत्रांची गुंतागुंत, या सर्वांवर मात करत गेल्या वर्षी 'बेलगंगा' साखर कारखाना पुन्हा दिमाखाने सुरु झाला. शेतकऱ्यांना उसाच्या शेतीचा पर्याय, तरूणांना रोजगाराच्या संधी आणि व्यावसायिकांना धंद्यासाठी लागणारे भांडवल अश्या अनेक आश्वासनांवर 'बेलगंगा' साखर कारखाण्याचा यशस्वी प्रवास सुरु झाला आहे.   


खरंतर कुठल्याही दिग्दर्शकाला भुरळ पाडेल अशी 'बेलगंगा' साखर कारखाण्याच्या पुनर्जीवनाची  कथा. उस आणि साखर हा महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी, तरुण, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते अश्या प्रत्येकालाच या यशोगाथेतून प्रेरणा मिळेल आणि ते देखील आपापल्या भागाच्या  विकासासाठी या 'चाळीसगाव पैटर्न' चा आदर्श घेतील अशी खात्री वाटते, असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिपक पाटील म्हणाले.


ज्यांच्या संघर्षमय प्रवासावर हा सिनेमा साकारला जाणार आहे त्या चित्रसेन पाटलांना विचारले असता ते म्हणाले, 'तीन-चार महिन्यांपूर्वी दिपक पाटील त्यांच्याकडे हा विषय घेऊन आले होते. स्थानिक वृत्तपत्र आणि इतर सोशल मीडीयावरून त्यांनी 'बेलगंगा' कारखाण्याविषयी वाचल होत, ऐकल होतं. त्यांना अधिकची माहिती हवी होती. म्हणून ते चाळीसगावला आले असता त्यांना आजवरचा सर्व प्रवास ऐकवला. त्यातूनच त्यांनी यावर सिनेमा बनवणार असे सांगितल्यावर क्षणभर हे खरं कि खोट अशी शंका निर्माण झाली. सर्रकन डोळ्यांसमोरून आजवरचे कष्ट, यातना, फ्रस्टस्रेशन, पर्सनल कोम्प्रमाजेस, आपल्या पाठीमागे उभे राहिलेल्या सोबत्यांचे  आश्वासक चेहरे हे सर्वच क्षणार्धात डोळ्यांसमोरून तरळून गेलं. गेल्या काही वर्षात बेलगंगेच्या या चळवळीत मी स्वःतालाही विसरलो होतो”.   


“खरंतर कुठल्याही प्रसिद्धीसाठी आपण काम करत नाही तर त्यातून आपल्या तालुक्यातील तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा हेतू होता. म्हणूनच बेलगंगा साखर कारखाना पुनर्जीवित करण्यासाठी ही लोक चळवळ उभारली. आता यात दिग्दर्शकांना नाट्य दिसले आणि ते सिनेमा करू इच्छितात हे ऐकून निश्चितच समाधान वाटतंय. चित्रपटाची निर्मिती मुंबईस्थित ओंजळ आर्ट्स प्रोडक्शन करत असून चित्रपटाचे पोस्टर लाँच लवकरच होणार आहे. त्यावेळी अधिकची माहिती सांगत येईल असे चित्रपटाच्या निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या.