`माझा होशील ना` मालिकेचं शीर्षकगीत ऐकलं का...?
`झी मराठी`च्या मालिका या त्यांच्या शीर्षकगीतासाठीही ओळखल्या जातात
मुंबई : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे अनेक प्रोमोसुद्धा प्रदर्शित केले जात आहेत. एका अनोख्या कुटुबाची झलकही मालिकेच्या निमित्ताने पाहता येणार आहे. ज्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत असणार आहे एक प्रेमाचं नातं.
प्रेमाचं हेच नातं कसं खुलतं हे सांगणारं माझा होशील ना, या मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आलं आहे. कोणतीही मालिका तिच्या शीर्षकगीतातून अगदी सहजपणे उलगडत जाते. याचीच प्रचिती या मालिकेच्या गीतातूनही होत आहे.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आर्या आंबेकर हिने गायलं आहे. 'लिटील चॅम्प्स' या रिऍलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेल्या आर्या आंबेकरने गायन क्षेत्रात गायलेली उंची आणि सध्याच्या घडीला तिला मिळणाऱ्या या संधी पाहता आर्याचा सुरेल आवाजही या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे.
पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल
'माझा होशील ना', या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहिण गौतमी आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस असे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोन नव्या जोमाच्या कलाकारांसह सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी असे अनेक प्रसिद्ध कलाकार देखील झळकणार आहेत. २ मार्च पासून ही मालिका रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.