लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींना Nia Sharmaने लगावला टोला; म्हणाली...
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.
मुंबई : देशात कोरोना व्हायरसचं संकट दिवसागणिक वाढत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत भयंकर असल्याची दिसून येत आहे. रूग्णसंख्या तर वाढतचं आहे, पण मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. यासाठी 28 एप्रिलपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशात अनेक सेलिब्रिटी 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस घेण्यासाठी आवाहन करत आहेत.
अशात टीव्ही अभिनेत्री निया शर्माने मात्र लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींना टोला लगावला आहे. लस अत्यंत गरजेची आहे, पण कोणत्या केंद्रावर लस घ्यावी? असा प्रश्न तिने याठिकाणी उपस्थित केला. 'देशात सेलिब्रिटी लोकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन करत आहे. कृपा करून लस उपलब्ध असलेल्या केंद्रांची नावंदेखील सांगा. ज्यामुळे रांगेत उभे असलेले हजारो नागरिक मुर्ख दिसणार नाहीत.' असं ट्विट नियाने केलं आहे.
दरम्यान, देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे घरा बाहेर पडू नका. गरजेच्याचं कामासाठी बाहेर पडा. असं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.