Nitin Desai Suicide : महाराष्ट्रासह भारतीय जगताला हादरा देणारी घटना बुधवारी सकाळी घडली. प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. चित्रपटसृष्टीमध्ये मोठं नाव असणाऱ्या या बड्या कलाकाराचा असा अंत होणं ही अतिशय हादरवणारी बाब असून, कलाकारांसह सिनेरसिकांसाठीही हा एक धक्काच होता. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओच्या रुपात एक असं स्वप्न साकारलं ज्यानिमित्तानं भारतीय कलाजगताला एक वेगळी कलाटणी मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाजगतासोबतच राजकीय वर्तुळासाठीसुद्धा देसाईंचं नाव नवं नव्हतं. कारण, महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही येवो, शपथविधी असो किंवा तत्सम मोठा कार्यक्रम, स्टेज लागणार तो देसाईंचाच असं समीकरणच तयार झालं होतं. 


2019 मध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली होती त्यावेळी त्याच्या शपथविधी सोहळ्यासाठीच्या व्यासपीठाची आखणी आणि पूर्ण तयारी ही नितीन देसाई यांच्याच मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. त्यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेसह राजमुद्रेचीही प्रतिमा साकारण्यात आली होती. 


हेसुद्धा वाचा : Nitin Desai Sucide: 249 कोटींचं कर्ज, स्टुडिओ जप्तीचा प्रस्ताव; म्हणूनच नितीन देसाई होते नैराश्यात!


 


कुतूहलाची बाब म्हणजे ज्यावेळी 1995 मध्ये जेव्हा शिवसेना- भादजप युतीचं सरकार सत्तेवर आलं आणि मनोहर जोशी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हाही व्यासपीठाच्या सजावटीची जबाबदारी देसाईंच्याच खांद्यावर होती. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली त्यावेळीसुद्धा शपथविधी सोहळ्यासाठीच्या व्यासपीठाची जबाबदारी देसाईंकडेच होती. थोडक्यात सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरीही सत्तेची सुरुवात जिथून होणार तिथं मात्र देसाईंचाच ठसा उमटत होता. 


कारकिर्दीवर एक दृष्टीक्षेप 


1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या '1942 अ लव स्टोरी' या चित्रपटाच्या सेट डिझाईनमुळं देसाईंना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली होती. त्यांचं योगदान असणाऱ्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या चित्रपटानंही बॉक्स ऑफिस गाजवलं. 'जोधा अकबर', 'लगान' म्हणू नका किंवा मग 'मुन्नाभाई एमबीबीएस' गाजलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर नितीन देसाईंचच नाव होतं आणि यापुढेही कायम राहील. फरक फक्त इतकाच, की यापुढे देसाई मात्र व्यक्तीगतरित्या कुठेच नसतील.