मुंबई : झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक आसावरी या व्यक्तिरेखेला खूप पसंत करत आहे. आई, सून, सासू अशा प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी ही महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, "अग्गंबाई सासूबाई च्या गोष्टीतच वेगळेपणा आहे. मुळात माझ्या वयाशी साधर्म्य साधणारी एक स्त्री एका डेली सोपची नायिका असू शकते हा विचारच धाडसी होता. मला ‘आसावरी’ तिच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी भेटली, पण त्याआधी तिचं ५० वर्षांचं आयुष्य काय पद्धतीने तिने घालवलं असेल याचं एक कॅरेक्टर स्केच मी तयार केलं आणि तिचा स्वभाव अंगी बाणवायचा प्रयत्न केला. मी या आधी निभावलेल्या भूमिकांसाठी भरपूर मेकअप, केसांना जड गंगावन, भरपूर नक्षीकाम असलेला पदर आणि तोही डोक्यावरून, असा सगळा जामानिमा करावा लागायचा. या सगळ्यामुळे मला ‘आसावरी’ जास्त सोपी वाटते आणि आवडते. त्यात मेकअप नाही, भारी कपडेपट नाही, दागदागिने नाहीत. त्यामुळे सगळं अगदी छान सहज सुरू असतं."



आसावरी ही अशा स्त्रीयांना रिप्रेझेंट करते ज्यांनी आपलं आयुष्य फक्त कुटुंबासाठी वाहिलं. स्वतःचा विचार न करता एक स्त्री फक्त आणि फक्त कुटुंबासाठी झटताना दिसते. आपला आनंद, सुख, समाधान सारं बाजूला सारून फक्त कुटूंब असं लक्षकेंद्रीत केलेल्या या स्त्रीयांना झी मराठीने 'आसावरी'च्या रुपात महाराष्ट्रासमोर आणलं आहे. 



मालिकेत आता आसावरीच्या दुसऱ्या लग्नाची रेलचेल पाहायला मिळतं. एका विधवा स्त्रीचं दुसरं लग्न हीच गोष्ट मुळात आजही न पटणारी आहेत. अशातच या स्त्रीला मुख्य भूमिकेत आणून मालिका सादर केल्यामुळे अशा स्त्रियांकडे सकारात्मकपणे पाहिलं जाऊ शकतं. समाजाचा विधवा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेची खूप मदत होऊ शकते.