मुंबई : बऱ्याचदा लहानपणी मनावर झालेले आघात मोठेपणीच्या स्वभावात परावर्तित होताना दिसतात. असं नाहीच झालं, तर मग अनेक कारणांनी त्या कटू आठवणी जाग्या होतात आणि परिस्थितीवर आपणच मिश्किलपणे हसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील एका अशाच सेलिब्रिटीला तिच्या लहानपणी विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागला होता. 


तिच्यावर शारीरिक टीका तर, वारंवार करण्यात आली. खिल्ली उडवली गेली. आज मात्र आपल्याशी घडलेल्या या प्रसंगांवर ती अगदी ठामपणे बोलत आहे. 


ही सेलिब्रिटी आहे, मसाबा गुप्ता. अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची ही लेक. 


आपल्या लहानपणीच्या आठवणी शेअर करताना एका मुलाखतीत तिनं लिहिलं, 'मला आठवतंय की जेव्हा मी इयत्ता आठवीत असताना काय केलं होतं, मी गुपचूप आईच्या मेकअप किटमध्ये डोकावलं.... मला तिचं फाऊंडेशन लावायचं होतं. हे मला फक्त काहीसं उजळ दिसण्यासाठी करायचं होतं'. 


उजळ त्वचेसाठी असणारं वेडच त्यावेळी मसाबानं पाहिलं होतं. पण, फाऊंडेशन लावल्यानंतर मात्र तिला तिच्या त्वचेचा खरा रंग कोणता आहे हे कळलं. पण त्याच फाऊंडेशनमध्ये ती शाळेत गेली आणि तिथं सर्वांच्याच ही गोष्ट लक्षातही आली. 


शाळेत मसाबाची खिल्ली उडवली जात असल्यामुळं या साऱ्याचा तिच्यावर परिणाम होताना दिसत होता. ती स्वत:चाच तिरस्कार करु लागली होती. 




'मला कोणतरी वेगळंच व्हायचं होतं. मी कोण होते याचाच थांगपत्ता लागत नव्हता. मला असे केस का, मी अशीच का? मी इतरांसारखी का दिसत नाही...' हेच प्रश्न मसाबाच्या मनात घर करत होते. 


मला इतरांहून वेगळं नाही तर त्यांच्यापैकीच एक दिसायचं आहे असाच तिचा हट्ट होता. लहानपणीच्या घटना आपल्या मनावर किती परिणाम करुन जातात हेच तिच्या बोलण्यातून जाणवत होतं.