कोरोना रुग्ण आढळल्यामुळे अभिनेत्रीची सोसायटी सील
कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वात जास्त संख्या मुंबईत आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या विषाणूचा वाढता धोका पाहता मुंबईतील अनेक ठिकाणं सील करण्यात आली आहेत. त्यामध्ये 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हाणून येथील परिसर सील करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत. त्यामध्ये सर्वात जास्त संख्या मुंबईत आहे. राज्यात एकूण कोरोना रूग्णांची संख्या ६६१ वर गेली आहे.
टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अंकिता ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते त्या कॉम्प्लेक्समधील एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. करोनाची लागण झालेला व्यक्ती स्पेनवरुन भारतात परतला होता. भारतात परतल्यानंतर त्या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.
दरम्यान, १२ दिवसांनंतर त्याच्यात कोरोना व्हायरसची लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यास सुरूवात झाली आहे. या सोसायटी मध्ये अंकिताशिवाय अशिता धवन, नताशा शर्मा, मिश्कत वर्मा यांसारखे सिलिब्रिटी राहतात. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
वरील माहिती खरी असल्याची ग्वाही अभिनेत्री अशिता धवनने दिली, 'माझ्या विंगमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीस सध्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस आणि बीएमसीने फार मदत केली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते.' अशी प्रतिक्रिया अशिताने दिली.