मुंबई : ९२व्या Oscars2020 ऑस्कर पुस्कार सोहळ्याचा मुख्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारासाठी नामांकनप्राप्त चित्रपटांची नावं जाहीर करण्यात आली. या नामांकनप्राप्त सिनेमांमध्ये सध्या एका कोरियन सिनेमाची चांगली चर्चा आहे. हा सिनेमा आहे कोरियातला, पण तो सध्या बड्याबड्या इंग्लिश सिनेमांना टक्कर देतोय, तेदेखील थेट हॉलिवूडला जाऊन...ऑस्कर पुरस्कारासाठी 92nd Academy Awards नॉमिनेशन मिळालेल्या पॅरासाईटची  Parasite सध्या जोरदार हवा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला 'पॅरासाईट' हा कोरियन सिनेमा आहे. दक्षिण कोरियाचा हा सिनेमा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. कारण हॉलिवूडमधल्या दिग्गजांनी तयार केलेल्या चित्रपटांच्या शर्यतीत प्रथमच एक बिगरइंग्रजी चित्रपट उतरलाय आणि याची चर्चा इतकी आहे की कदाचित ऑस्करची बाहुलीही या 'पॅरासाईट'लाच मिळेल.


बाँग जून हू यांनी मांडलेली किम या कुटुंबाची ही कथा आहे. रोजंदारीवर जगणारं हे कुटुंब पार्क्स यांच्या घरामध्ये विविध क्लुप्त्या वापरून शिरकाव करतं. त्याच वेळी कर्जदारांना चुकवण्यासाठी घराच्या तळघरात लपून बसलेल्या आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी आधी घरकाम करणारी महिला येते आणि त्यातून त्या घरात प्रचंड नाट्य घडतं. अतिशय थक्क करणारी ही ब्लॅक कॉमेडी क्रिटिक्सना प्रचंड भावली आहे.


'पॅरासाईट'वर जगभरातून पुरस्कारांचा वर्षाव होतोय. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पाम डी ओर पुरस्कार 'पॅरासाईट'ला मिळाला. आता तर जोकरसह अनेक उत्तमोत्तम चित्रपटांच्या स्पर्धेमध्ये 'पॅरासाईट' उतरलाय. त्यानं हा पुरस्कार पटकावला तर ऑस्करची सर्वोत्कृष्ट पुरस्काराची ट्रॉफी मिळवणारा तो पहिला बिगर इंग्रजी चित्रपट ठरेल. आता ९ तारखेला होणाऱ्या मुख्य सोहळ्यात कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.