सैन्य दलास पीआरचा भाग बनवलंय, विशाल दादलानीची सरकारवर टीका
डॉक्टरांना फुलांची नव्हे तर पीपीई किटची गरज असल्याचे ट्वीट विशाल ददलानीने केले
मुंबई : तिन्ही सैन्य दलाने आज कोरोना वॉरीयर्सना सलामी दिली. कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णालयांवर आकाशातून फुलांचा वर्षाव केला गेला. बॉलीवुड सिंगर विशाल ददलानी याने यावरुन सरकारवर टीका केली आहे. आजच्या घडीला डॉक्टरांना फुलांची नव्हे तर पीपीई किटची गरज असल्याचे ट्वीट विशाल ददलानीने केले आहे.
एकीकडे फायटर जेट रुग्णालयांना सलामी देत आहेत तर दुसरीकडे आमच्याकडे पीपीई किट नाही असे सांगणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जात आहे. आमच्या सैन्य दलाला पीआरचा हिस्सा बनवलं जात आहे. मजुरांना एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी पैसे घेतले जात असल्याची टीका देखील ददलानी याने केली आहे.
या ट्वीटनंतर विशाल ददलानीला ट्रोल करण्यात आले आहे. असा द्वेश पसरवू नका असे एकाने म्हटले. तर आपले डोळे उघडा आणि लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघा. छोट्या छोट्या गोष्टीत अनेक बदल झाले आहेत, असे दुसऱ्याने म्हटले आहे. विशाल दादा तुम्ही चष्मा चुकीचा घातला आहे. तो बदललात तर वेगळे चित्र दिसेल असे एकाने म्हटले आहे.
कोरोना वायरसचे वाढते संक्रमण पाहता ३ मे पर्यंत असलेला लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.