नवी दिल्ली : जसजशी संजय लीला भन्साळी निर्मित 'पद्मावत' सिनेमाची प्रदर्शन तारीख जवळ येतेय, तसतसा या सिनेमाला विरोध वाढतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणी सेनेनं राजस्थानात संजय लीला भन्साळी यांच्या येण्यावरच स्वयंघोषित बंदी घातलीय. इतकंच नाही तर सिनेमाचा विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी रात्री काही लोकांनी एका सिनेमाघरातल्या तिकीट काऊंटरलाच आग लावून दिली. ही घटना फरीदाबादच्या वल्लभगड इथं घडलीय. 



काही तरुणांनी एका मॉलमध्ये तिकीट काऊंटरला आग लावली... आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओही बनवला. पोलिसांनी या घटनेविरुद्ध तक्रार दाखल केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात लोक चेहऱ्यावर कपडा गुंडाळून मॉलमध्ये घुसले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही. अज्ञातांविरुद्ध कलम ४३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 


शुक्रवारी रात्री ८ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. मॉलबाहेर गार्डस असतानाही हे लोक दहशत पसरवणाऱ्या कृत्य करण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरतेय. 


दीपिका पादूकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांचा 'पद्मावत' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. सिनेमावर काही राज्यांमध्ये लावण्यात आलेला बॅन सुप्रीम कोर्टानं हटवलाय.