मुंबई : जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरुच आहेत. पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन एम मजारी यांनी यूनिसेफच्या (UNICEF)  प्रमुखांना पत्र लिहून, अभिनेत्री प्रियंका चोप्राला यूएनच्या गुडविल अॅम्बेसेडर (सद्भावना दूत) या पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. याआधीदेखील मजारी यांनी ट्विट करत प्रियंकाला या पदावरुन हटवण्याबाबत म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाने युद्धाचा प्रसार केल्याचा आरोप मझारी यांनी केला. त्यांनी ट्विट करत, 'प्रियंकाने भारतीय सैन्य आणि खराब मोदी सरकारला पाठिंबा दर्शविला आहे, त्यामुळे प्रियांकाला त्वरित गुलविल अॅम्बेसेडर या पदावरुन काढून टाकावं. युनिसेफने अशाप्रकारच्या मानद पदांसाठी आपण कोणाची निवड करत आहोत, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा अशा नियुक्त्या केवळ तमाशा म्हणूनच राहतील' असं मजारी यांनी म्हटलं आहे.


काश्मिरमध्ये जे काही झालं ते, मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय सम्मेलनांचे उल्लंघन केल्यामुळे झालं असल्याचं पत्रात म्हटलं आहे. 


प्रियंकाने सार्वजनिकरित्या भारत सरकारच्या स्थितीचं समर्थन केलं आहे. एवढेच नाही तर, भारताच्या संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या आण्विक (न्यूक्लियर) धमकीला या अभिनेत्रीने पाठिंबा दर्शविला, असल्याचं पत्रात म्हटलंय. 


'हे सर्व शांतता आणि सुसंवाद या तत्त्वांच्या विरोधात आहे. काश्मिरमधील आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केल्याबाबत प्रियंका मोदी सरकारला पाठिंबा देत आहेत. या सर्व गोष्टी प्रियंकाला यूएनमध्ये देण्यात आलेल्या तिच्या पदासाठीची विश्वासार्हता कमी करत असल्याचं' पत्रांत म्हटलंय.



पाकिस्तानातील एका तरुणीकडून प्रियंकावर आरोप लावण्यात आला. प्रियंकाने पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या बाजूने ट्विट करत पाकिस्तानविरुद्ध आण्विक युद्धाच्या धोक्याबाबत समर्थन दिलं असल्याचा, आरोप आयशा मलिक या तरुणीने केला होता. 



प्रियंकाने यावर तिला सडेतोड उत्तरही दिलं होतं. 'माझे अनेक चाहते आहेत. पाकिस्तानातही माझा मोठा चाहता वर्ग आहे. त्यासाठी धन्यवाद. मी भारतीय आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. मी याचं समर्थनही करत नाही. पण मी एक देशभक्त आहे. जर मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागत असल्याचं' प्रियंकाने म्हटलं होतं.


प्रियंकाने पाकिस्तानी महिलेला दिलेल्या याच उत्तरामुळे पाकिस्तान मंत्र्याने यूनिसेफकडे प्रियंकाला गुडविल अॅम्बेसेडर म्हणून हटविण्याची मागणी केल्याचं बोललं जात आहे.