Panchak Movie Review: घरातील ज्येष्ठ व्यक्ती मृत्यूमुखी पडलीय..मृतदेह वऱ्हांड्यात आहे. घरचे गावचे सर्व गोळा झालेयत..अंत्यविधीसाठी भटजी आलेयत..मृत्यूची वेळ पंचागात तपासून यांना पंचक लागलाय असे सांगतात...आणि घरासह सर्व गावाला मोठा धक्का बसतो..पंचक काळात मृत्यू हा अशुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार असे झाल्यास व्यक्तीचे नातेवाईक किंवा जवळच्या पाच जणांचा मृत्यू होतो. हा धागा पकडून सिनेमाला सुरु होतो आणि पंचक 'अशुभ काळात' किती मृत्यू होतात? घरच्यांची कशी भांबेरी उडते? यामागे विज्ञानाचा कसा संबंध लावलाय हे सांगणारा सिनेमा म्हणजे 'पंचक'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री, धकधक गर्ल माधुरी दिक्षीत निर्माती असलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाची जास्त चर्चा होती. त्यात कोकणातील एका विशिष्ट भागात मानल्या जाणाऱ्या प्रथेवर आधारित हा सिनेमा आहे. लोक पाळत असलेली अंधश्रद्धा हलक्या फुलक्या पद्धतीने मांडून त्यावर विचार करायला लावणारा सिनेमा असा अंदाज ट्रेलर पाहून येतो.


कोकणात राहणाऱ्या अनंत खोत (दिलीप प्रभावळकर) यांचा मृत्यू झालाय. अनंत खोत हे विज्ञानवादी होते, अर्थात ते अंधश्रद्धा मानत नव्हते. अगदी एक घाव दोन तुकडे असं न करता हलक्या पद्धतीने ते समोरच्याला त्याची चूक दाखवून देत असत. माधव (आदिनाथ कोठारे) हा त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेला तरुण...अनंत खोतांचा माधववर खूप जीव..मृतदेहावर अंत्यविधी करण्याआधी माधव तिथे पोहोचतो आणि अनंत काकांनी देहदानाचा निश्चय केला होता,याची आठवण तो करुन देतो. खोतांना पंचक लागल्याचे भटजी सांगतात, त्यामुळे घरचे आणि जवळच्यांची घाबरगुंडी उडालेली आहे. त्यात खोतांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता देहदानासाठी पाठवण्यात येतो. अंत्यविधी करणारे भटजी तसेच अंत्यविधीच्या सामानाची विक्री करणारे, अंत्यविधी न करणारे विघ्न असल्याचे सर्वांच्या मनात बिंबवतात.


(ज्योतिष शास्त्रानुसार पंचक काळात एखाद्याचा मृत्यू झाल्यास ते अशुभ मानले जाते. पंचक काळात मृत्यू झाल्यास कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होण्याची भीती असते. मृत्युपंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबरोबरच कुशाचे पाच पुतळे बनवून विधीनुसार अंतिम संस्कार करण्याचा नियम मानला जातो आहे. असे केल्यास पंचकातील अशुभ परिणाम टाळता येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.)


यातून पुढे सिनेमाच्या कथेला सुरुवात होते. भयावह कथा सांगताना परिस्थिती हलकीफुलकी ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले सीन्स आणि म्युझिक हे मूळ कथेला दूर घेऊन जातात. माधव विज्ञानाचा आधार घेऊन ही अंधश्रद्धा असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण विज्ञानावर विश्वास नसणाऱ्यांना त्यांना पटेल अशाच भाषेत सांगण्याचा निर्णय तो घेतो. यासाठी माधव काही कल्पना आखतो. त्या यशस्वी होतात का? की माधवच त्याच फसतो? अनंत खोतांनंतर घरात आणखी कोणाचे मृत्यू होतात? हे सर्व कथेत सांगितले आहे.


राहुल राध्येश्याम आणि जयंत जठार यांच्या लेखन, दिग्दर्शनातून हा सिनेमा घडलाय. सिनेमाची पहिली फ्रेम तुम्हाला कोकणच्या प्रेमात पाडेल. कोकणातील घरे, निसर्ग, माणसे, रस्ते, विधी यांचे चांगले चित्रण तुम्हाला या सिनेमात पाहता येईल. आनंद इंगळे, नंदीता धुरी, दीप्ती देवी यांचा अभिनय आणि कॉमेडीने सिनेमा खेळवून ठेवलाय. भारती आचरेकर, सतीश आळेकर यांचेही छोटे पण प्रभावी काम सिनेमात पाहायला मिळते. आदिनाथ कोठारे आणि तेजश्री प्रधान यांच्याकडून अभिनयाच्या बाबतीत जास्त अपेक्षा होत्या. पण त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांमुळे कदाचित त्या पूर्ण होत नसाव्यात.


पंचक न आवडण्याची कारणे


दिलीप प्रभावळकर म्हणजेच सिनेमातील अनंत खोत हे सुरुवातीलाच मृत्यूमुखी दाखवले आहेत. त्यांचे सिनेमातील काम फक्त नॅरेटर म्हणून आहेत. दिलीप प्रभावळकरांचा सिनेमातील वावर अगदीच जेमतेम आहे. त्यामुळे तुमचा मोठा भ्रमनिरास होऊ शकतो.


कोकणातील विशिष्ट भागात 'पंचक' प्रथा मानली जाते. त्यामुळे 'पंचक' विशिष्ट प्रेक्षकवर्गालाच जास्त जवळचा वाटू शकतो. पंचक लागला म्हणजे मृत्यूमुखी पडलेल्याच्या नातेवाईक-जवळच्यांपैकी 5 जणांचा मृत्यू होणार हे प्रेक्षकांना पटवून देण्यात, त्यांच्या मनात भीती तयार करण्यात यश आलेलं दिसत नाही.


  • सिनेमातील पात्र, त्यांची भाषा, पेहराव आणि त्यांचे वागणे यामध्ये तफावत आढळते. त्यामुळे ठराविक पात्र सोडली तर बाकीचे मनाला भिडत नाही.

  • विषयाची मांडणी अधिक उत्तम करता आली असती.

  • सिनेमातील संगीत उत्तम पण मध्यांतराआधी सिनेमातील दृश्यांवर लादल्यासारख वाटतंय.

  • 'हॅप्पी एंडींग' केलंय पण त्यामागचं कारण स्पष्ट होत नाही.


स्टार: तीन