मुंबई : पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल झिरपण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करताना, अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या 'पाणी फाऊंडेशन'तर्फे अलीकडेच पुण्यात 'सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२३ पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमिर खान, किरण राव आणि 'पाणी फाऊंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी चषक २०२३ पुरस्कार सोहळ्यादरम्यान 'पाणी फाऊंडेशन'ची सात प्रभावी वर्षे साजरी करताना, आमिर खानने आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या भविष्यातील योजना कथन केल्या. डिजिटल परिवर्तनाच्या आवश्यकतेवर भर देताना आमिर खान म्हणाला, "सर्वतोपरी प्रयत्न करीत आम्ही या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आम्ही यंदापासून तंत्रज्ञानाच्या वापराची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. या वर्षी होणारी ही स्पर्धा डिजिटल पद्धतीने होणार असून, आम्हां सर्वांसाठी हे एक प्रशिक्षण असेल. 


त्यात यश आल्यास यंदा आम्ही गटशेती राबवणार आहोत. येत्या दोन वर्षांत प्रत्येक प्रदेशाशी जोडले जाण्याचे आणि प्रत्येक प्रदेशात गटशेती करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला आनंद आहे की, गेल्या काही वर्षांत आमचे २० हजारांहून अधिक सदस्य सक्रियपणे समूह शेती करत आहेत आणि आम्ही या आकडेवारीत आणखी भर घालण्यास आणि कार्य सातत्याने चालू ठेवण्यास वचनबद्ध आहोत.''


पुण्याच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेडियममध्ये अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या 'सत्यमेव जयते शेतकरी चषक पुरस्कार' सोहळ्यात अभिनेता आमिर खान, सिने निर्मात्या किरण राव, सत्यजित भटकळ आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. या समारंभात दीपप्रज्वलनासह वेधक कार्यक्रम सादर करण्यात आले. डॉ. पोळ यांनी आपल्या भाषणात कोणत्याही प्रकल्पाच्या यशासाठी भागीदारी महत्त्वाची असते, यांवर भर दिला आणि एका प्रकारे कार्यक्रमाची दिशा निश्चित केली.


'पाणी फाऊंडेशन' ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी स्वयंसेवी संस्था असून, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ निवारण आणि पाणलोट व्यवस्थापन विषयक कामांत या संस्थेने आपला ठसा उमटवला आहे. संस्थेचे कार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आता डिजिटल पद्धतीने उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.