...म्हणून वडील कधीच थिएटरमध्ये माझा चित्रपट पहायचे नाहीत; पंकज त्रिपाठींनी सांगितलेली आठवण
Pankaj Tripathi Father Never Watched Films In Theatre: पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना एका मुलाखतीमध्ये उजाळा दिलेला. यावेळेस त्यांनी अगदी दिल्लीला जाण्यासाठी वडिलांना काय सांगितलं इथपासून ते त्यांच्या सवयींबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
Pankaj Tripathi Father Never Watched Films In Theatre: अभिनेता पंकज त्रिपाठीच्या वडिलांचं सोमवारी (22 ऑगस्ट 2023 रोजी) निधन झालं. ओएमजी-2 हा सध्या तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत असल्याचे चर्चेत असलेल्या पंकज त्रिपाठींच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंकजचे वडील पंडित बनारस तिवारी यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं.
समाधानाने जगले
"ते आपलं 99 वर्षांचं आयुष्य समाधानाने जगले. त्यांच्यावर आजच अंत्यसंस्कार कुटुंबातील जवळच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये केले जातील. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या गोपालगंजमधील मूळ गावी परतण्याच्या मार्गावर आहेत," असं निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्रिपाठी कुटुंबाने सोमवारी जारी केलेल्या पत्रकारमध्ये म्हटलं होतं.
ते माझं काम केवळ टीव्हीवर आणि कंप्युटरवर पहायचे
पंकज त्रिपाठी हे अगदी 'मिर्झापूर' वेबसिरीजमधून घरोघरी पोहचण्याआधी आणि त्यांना स्टारडम मिळण्याआधीपर्यंत आपल्या वडिलांबरोबर शेतात कामं करायचे. त्रिपाठी कुटुंब हे बिहारमधील बेलसंद गावात राहतं. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी खुलासा करताना, माझ्या वडिलांना माझ्या यशाबद्दल फारचा अभिमान वाटत नाही असं म्हटलं होतं. मी मनोरंजन सृष्टीमध्ये नेमकं काय काम करतो याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळेच माझे वडील माझा चित्रपट पाहण्यासाठी कधी चित्रपटगृहामध्येही गेले नाहीत, असंही पंकज त्रिपाठींनी सांगितलं होतं. "कोणी त्यांना कंप्युटरवर किंवा टीव्हीवर मी काम केलेला चित्रपट दाखवला तर ते पहायचे. मी नुकताच घरात त्यासाठी टीव्ही घेतला होता," असं पंकज म्हणाले होते.
आई अभिनय पाहतच नाही
पंकज यांनी याच मुलाखतीमध्ये आई हेमवंती पंकज त्रिपाठी यांच्याबद्दलही सांगितलं होतं. "माझी आई मला टीव्हीवर पाहते. मात्र त्यानंतर घरच्यांना सांगते की त्याला कॉल करा आणि सांगा फार बारीक झाला आहेत. तो नीट जेवत नाही वाटतं. त्याला नीट झोपही घ्यायला सांगा. ती माझ्या अभिनयावर फारसं लक्ष देत नाही," असं पंकज त्रिपाठी म्हणाले होते.
मी डॉक्टर व्हावं असं वाटत होतं
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेलया मुलाखतीमध्ये माझ्या वडिलांना केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर या दोनच प्रोफेशनबद्दल माहिती होती, असं पंकज म्हणाले होते. "मी दोन वेळेच्या जेवणाइतकं कमवू शकतो का याचीच त्यांना चिंता होती. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी दिल्लीला गेलो तर मला सरकारी नोकरीही मिळू शकते. आता मध्यमवर्गीय लोकांना सरकारी नोकरी म्हटल्यावर चांगलं असेल असं वाटतं. याच विचाराने माझ्या वडिलांनी मला दिल्लीला जाऊ दिलं," अशी आठवण पंकज यांनी सांगितली होती.