हत्येचा आरोपी अभिनेता दर्शनच्या प्रेमापोटी चिमुरड्याला कैद्याचे कपडे घालून काढले फोटो; पालकांवर आलं मोठं संकट
पालकांनी मुलाला कैद्याचे कपडे आणि हातात बेड्या घालून फोटोशूट केलं असून, यावेळी त्याच्या कपड्यांवर अटकेत असणारा अभिनेता दर्शनचा कैदी क्रमांक 6106 लिहिला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ते पाहून नेटकरी चिंता व्यक्त करत आहेत.
कन्नड अभिनेता दर्शनला (Darshan) चाहत्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलं असून सध्या तो जेलमध्ये आहे. यादरम्यान त्याचे चाहते असणाऱ्या एका जोडप्याने आपल्या नवजात मुलाला कैद्याचे कपडे घालून फोटोशूट केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्याच्या हातात बेड्या घातल्या होत्या. तसंच कपड्यांवर दर्शनचा कैदी क्रमांक 6106 लिहिण्यात आला होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ते पाहून नेटकरी चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान हे फोटोशूट करणं दांपत्याला महागात पडलं असून ते कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (KSCPCR) या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे आणि पोलिसांना पालकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोत चिमुरडा कैद्याच्या कपडेत दिसत आहे. तसंच त्याच्या कपड्यांवर 6106 असा कैदी क्रमांक लिहिण्यात आला आहे. जेलमध्ये असणाऱ्या दर्शनचा हाच कैदी क्रमांक आहे. हे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केएससीपीसीआरचे सदस्य शशिधर कोसंबे यांनी या फोटोशूटचा निषेध केला आणि हे बाल न्याय कायद्याचे उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे. "या अनुचित फोटोशूटसाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल," असं कोसंबे यांनी सांगितलं आहे.
आयोगाने गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांना वादग्रस्त फोटोशूटमध्ये सहभागी असणाऱ्या पालकांना शोधण्यास सांगितलं आहे. हे कृत्य केवळ निषेधार्हच नाही तर बेकायदेशीरही आहे आणि कायद्यातील सर्व संबंधित तरतुदींनुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे कोसंबे यांनी नमूद केले.
दरम्यान, दर्शनच्या कैदी क्रमांक 6106 ला सोशल मीडियावर अनपेक्षित लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेत्याचे चाहते टॅटू काढत असून, आपल्या वाहनांवर नंबर प्रदर्शित करत आहेत. 'कैदी नंबर 6106' सारख्या चित्रपटाच्या शीर्षकांच्या नोंदणीसाठी फिल्म चेंबरशी संपर्क साधण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. नकारात्मक प्रभाव आणि गुन्हेगारी वर्तनाचा गौरव केला जात असेल तर ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले आहेत. दर्शन, त्याची साथीदार पवित्रा गौडा आणि इतर 15 जणांना चित्रदुर्गातील 33 वर्षीय रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.