मुंबई : झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या लोकप्रिय वाहिन्या सादर करणारा झी समूह लवकरच प्रत्येक क्षण उन्नत करत त्यांच्या लाडक्या मराठी प्रेक्षकांसाठी १७ ऑक्टोबर पासून 'झी वाजवा' ही नवीन सांगीतिक वाहिनी सादर करणार आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“झी वाजवा, क्षण गाजवा”, या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे, कारण क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट! हि वाहिनी प्रेक्षकांना डॉल्बी आवाजात ३००० पेक्षा जास्त गाणी आणि प्रेक्षकांना केंद्रासाठी ठेवून केलेले अनोखे कार्यक्रम सादर करणार आहे जे याआधी प्रेक्षकांनी दुसऱ्या कुठल्याच सांगीतिक वाहिनीवर पाहिले नसतील.


गाण्यांसोबतच ही वाहिनी आठवड्याचा शेवटी एक अनोखा विनोदी कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे 'भावड्याची चावडी'. चावडीच्या माहोलला मराठी तरुणाई रिलेट करू शकते कारण त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील ते आपल्या मित्र मैत्रिणींना जवळच्या कट्ट्यावर भेटून वेळ घालवतात, हाच माहोल झी वाजवा टेलिव्हिजनवर या कार्यक्रमातून सादर करणार आहे. या कार्यक्रमाची कथा भावड्या या कुठल्याही सामान्य मुला सारख्या असलेल्या मुलाभोवती फिरते. हा एक तरुण मुलगा आहे ज्याला असं वाटत कि त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे पण त्याला नक्की आयुष्यात पुढे काय करायचंय हे त्याला अजून कळलं नाही आहे. 


याच गोष्टीवर चर्चा करत भावड्या आणि त्याचे अजून २ मित्र त्याच्यासोबत चावडीवर वेळ घालवतात आणि त्यांच्या या चर्चेत ते अनेक कलाकारांना देखील आमंत्रित करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेतात. या कार्यक्रमातील भावड्या हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ भालेराव आहे. या कार्यक्रमातून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर आणि इतर अनेक कलाकार सिलेब्रिटी गेस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.


आपल्या टेलिव्हिजन पदार्पणाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना पार्थ भालेराव म्हणाला, "मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी वाजवा या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा हजर होतोय आणि येवेळी टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यासाठी मी खूप उत्सुक आहे. भावड्याची चावडी या कार्यक्रमात मी अगदी वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दुप्पट मजा, भरपूर मनोरंजन आणि आम्ही कलाकारांसोबत केलेला वेडेपणा या कार्यक्रमातून प्रेक्षक अनुभवू शकतील. या कार्यक्रमाच्या थीमसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील आणि म्हणूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवेल अशी मला खात्री आहे."


प्रत्येक मराठी संगीतप्रेमी आणि मराठी तरुणाईसाठी झी वाजवा ही वाहिनी चित्रपटातील आणि इतर गाणी सादर करणार आहे. या वाहिनीवरील प्रत्येक सादरीकर हे मराठी संगीतप्रेमी प्रेक्षकांची पसंती लक्षात घेऊन आणि त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून करण्यात आले आहे. प्रेक्षक त्यांच्या दिवसाची सुरुवात वाहिनीवर सकाळी लवकर सादर होणाऱ्या 'माऊली माऊली' या स्लॉट मधील मधुर भक्तीगीत ऐकून करू शकतात. झी वाजवा सकाळी उठा उठा या स्लॉटमध्ये दमदार गाणी सादर करून प्रेक्षकांना तरतरीत करेल. रोमँटिक गाण्यांसाठी 'याड लागलं' या खास स्लॉट सादर केला जाईल ज्यात प्रत्यके गाण्याच्या आधी एक खास डूडल लव्ह नोट दाखवण्यात येईल. हार्टब्रेक मधून जाणाऱ्या प्रत्येकाचा जिगरी यार बनून झी वाजवा 'सेंटी झालो रे' या दुपारच्या स्लॉटमध्ये खास गाणी सादर करेल.


झी वाजवा मनाची रिक्वेस्ट हा खास रिक्वेस्ट शो देखील सादर करणार आहे ज्यात सारखी गाण्यांची आवड असलेल्या लोकांची जोडी जुळवली जाईल.  करूया कल्ला या संध्याकाळच्या स्लॉट मध्ये गाणी सादर करून झी वाजवा प्रेक्षकांची संध्याकाळ अजूनच उत्साही बनवेल. तसंच रात्रीच्या वेळी शांत आणि सुखदायक अनुभवासाठी झी वाजवा इश्काची धुंदी या खास स्लॉटमधून मंद गाणी सादर करेल. वीकएंडला पार्टीवाल्या मूडसाठी झी वाजवा डॉल्बी वाल्या हा खास स्लॉट आणि वाजवा सॉलिड २० हा काउंटडाऊन शो सादर करेल. या उत्तम गाण्याच्या सादरीकरणासोबतच, झी वाजवा २ लघु स्वरूपाचे कार्यक्रम देखील सादर करणार आहे. लिम्लेट गप्पा - वोक्स पॉप स्वरूप असलेला हा कार्यक्रम मराठी तरुणाईसाठी त्यांचे विचार आणि मतं मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. तसंच तारे आपले सारे हा एक सिलेब्रिटी चॅट शो देखील प्रेक्षकांना झी वाजवावर पाहायला मिळेल.