सलमान खाननंतर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि साउथचे सुपरस्टार पवन कल्याण यांना बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एकीकडे सलमान खान आणि शाहरुख खान अशा मोठ्या कलाकारांना मिळत असलेल्या धमक्यांची चौकशी सुरु असतानाच आता पवन कल्याण यांनाही असाच धमकीचा फोन आला आहे. ज्यामध्ये दादागिरीची भाषा करत शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
9 डिसेंबरला जारी केलेल्या निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणारा एक संदेश आणि कॉल आला होता. ज्यामध्ये दादागिरीने अपशब्द वापरले आणि धमकीचा संदेश देखील पाठवला. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाहीये.
पवन कल्याणला जीवे मारण्याची धमकी
पवन कल्याण यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला होता. ज्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच शिवीगाळ करणारे अनेक मेसेजही आले होते. या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये. अखेर ही धमकी का आणि कशासाठी देण्यात आली? यासंदर्भात अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाहीये.
पवन कल्याण यांचा शेवटचा चित्रपट
पवन कल्याण यांच्या चित्रपटाबाबत बोलायच झालं तर त्यांचा शेवटचा चित्रपट 'ब्रो' होता. हा चित्रपट समुथिरकनी यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेत्याने 1996 मध्ये अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर पवन कल्याण यांनी 2008 मध्ये राजकारणात प्रवेश केला. देशाच्या कठीण काळामध्ये त्यांनी करोडो रुपयांची देणगी दिली आहे.