Pawankhind : चित्रीकरणादरम्यान `त्या` क्षणी अजय पुरकर यांना `वेगळाच` भास; ती आठवण अंगावर काटा आणणारी
दृश्याच्या चित्रीकरणासाठी दिग्दर्शकांनी पूर्ण दिवस राखून ठेवला होता. सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी भिजत होतो
मुंबई : ऐतिहासिक घडामोडी आणि प्रसंगांवर भाष्य करणारे चित्रपट साकारणं म्हणजे कलाकारांचं खरं कसब. आपल्याला उमगलेला इतिहास अतिशय समर्पकपणे प्रेक्षकांपुढे सादर करण्याचं हेच शिवधनुष्य गेली काही वर्षे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पेललं.
महाराजांनी स्वराज्य घडवत असताना केलेले भीमपराक्रम आणि त्यामुळं घडत गेलेला इतिहास लांजेकर यांनी मोठ्या आत्मियतेनं प्रेक्षांपुढे सादर केला.
यातच भर पडली ती म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या, 'पावनखिंड' या चित्रपटानं. (Pawankhind)
अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी आणि सहकलाकारांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये पावनखिंडीचा संघर्ष आण तेव्हाचा काळ रुपेरी पडद्यावर उलगडण्यात आला.
सध्या हा चित्रपट दमदार कमाई करत असतानाच त्यात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या बऱ्याच मुलाखती आणि चित्रपटांदरम्यानते त्यांचे अनुभव प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.
'पावनखिंड'मध्ये मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अजय पुरकर यांनी चित्रीकरणादरम्यान घेतलेला एक अनुभव खूप बोलका आणि अंगावर काटा आणणारा ठरत आहे.
चित्रपटातील एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी, जवळपास चित्रपटाच्या अखेरीस जिथं बाजीप्रभू देशपांडे यांना वीरगती प्राप्त होते तो सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग, असं पुरकर यांनी सांगितलं.
'या दृश्याच्या चित्रीकरणासाठी दिग्दर्शकांनी पूर्ण दिवस राखून ठेवला होता. सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी भिजत होतो.
तो क्षणच वेगळा होता. कोणीही कोणाशीही चकार शब्दही बोलत नव्हतं. संध्याकाळी जेव्हा, चित्रीकरण संपण्याच्या वळणावर आलो तेव्हा मला उगीचच असं वाटत होतं की आपल्याकडे सेटवर असणाऱ्यांव्यतिरिक्त इतरही काही लोक पाहत आहेत', असं ते म्हणाले.
ही मंडळी तिथं काही वाईट करण्यासाठी आली नव्हती, त्यांना मी झाडाझुडपांमध्ये पाहत होतो. ते अस्तित्त्वं फार बोलकं आणि अभूतपूर्व होतं, असं म्हणत तो क्षण भारावणारा आणि भावूक करणारा होता अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला.