शाहरुखचा `जवान` पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल
शाहरुख खानचा `जवान` चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण यामध्ये जवान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी रिफंड मागत तिकीट खिडकीवर रांग लावली.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या 'जवान' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, देशभरात 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले असून, इतिहास रचला आहे. चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं जात असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक जवान चित्रपट पाहिल्यानंतर रिफंड मागत आहेत. चित्रपट इतका चांगला असताना लोक पैसे परत का मागत आहेत? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच. पण यामागचं कारणच असं आहे की, प्रेक्षकांनी तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी अक्षरश: रांग लावली होती.
चित्रपट पाहायला गेल्यानंतर या प्रेक्षकांना आयुष्यात कधीही आला नाही, असा अनुभव आला. याचं कारण चित्रपटगृहात जवानचा दुसरा भाग आधी दाखवण्यात आला. प्रेक्षकांना जेव्हा हे समजलं, तेव्हा त्यांचा संताप झाला. यानंतर त्यांनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली आणि तिकिटाचे पैसे रिफंड करण्याची मागणी केली.
सहर रशीद नावाच्या एका तरुणीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तरुणी घऱातून निघण्यापासून ते चित्रपटगृहात जाण्यापर्यंतचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. जवान पाहायला जाण्यास असल्याने ती फार उत्सुक असते. पण जेव्हा ती चित्रपटगृहात पोहोचते, तेव्हा मात्र याआधी आयुष्याच कधीच घडला नाही असा प्रसंग तिला आणि इतर प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळतो.
या व्हि़डीओत ती सांगत आहे की, चित्रपट फक्त 1 तास 10 मिनिटातच संपला. जेव्हा स्क्रीनवर मध्यांतर असं आलं तेव्हा प्रेक्षकांनाही नेमकं काय झालं हे समजत नव्हतं. व्हिलन मेला आणि आता काय चित्रपट बाकी आहे असा विचार ते करु लागले. पण जेव्हा त्यांना चित्रपगृहाची चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी तिकिटाचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली.
1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ
सहरने 9 सप्टेंबरला ही पोस्ट शेअर केली आहे. तेव्हापासून 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला अनेकजण लाईक करत असून, कमेंट्सचाही पाऊस पडत आहे.
एका युजरने म्हटलं आहे की, भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असणाऱ्या या चित्रपटाची वाट लावल्याबद्दल तुम्ही खटला दाखल केला पाहिजे. जो अनुभव तुम्ही गमावला आहे, तो रिफंडने परत येणार नाही'. तर काहींनी हे वाईट आहे पण तितकंच मजेशीरही आहे असं सांगितलं आहे.