मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये घवघवीत यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज २४ मे रोजी 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेक वादांमध्ये अडकलेला 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट अखेर बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची प्रमुख भूमिका साकारली आहे. ऐन निवडणुकीत हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र काँग्रेसकडून या चित्रपटावर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अनेक अफवा पसरवल्या जातात. मोदी अतिशय उद्धट आहेत, अतिशय अहंकारी आहेत असं बोललं जातं. परंतु नरेंद्र मोदी याच्या अगदी उलट आहेत. त्यांच्यासारखा विनम्र व्यक्ती कोणी असूच शकत नाही. ते अतिशय नम्र असून देशासाठी त्यांनी स्वत:ला समर्पित केले आहे.' असं विवेक ओबेरॉयने 'झी २४ तास'शी बोलताना सांगितलं. 


पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्यावर चित्रपट बनवण्याची अनेकांची इच्छा होती. परंतु त्यावेळी नरेंद्र मोदीं चित्रपट माझ्यावर नाही तर अटल बिहारी वाजपेयी, दिन दयाळ उपाध्याय यांसारख्या व्यक्तींवर बनवावा. ज्यांनी देशाची सेवा केली आहे त्यांच्यावर चित्रपट बनवावा असं त्यांनी म्हटल्याचं' विवेकने मोदींबद्दल बोलताना सांगितलं. 


'चित्रपटावेळी माझ्यावर मी नरेंद्र मोदींना हिरो बनवत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. परंतु कोणीही मोदींना हिरो बनवू शकत नाही, ते आधीच हजारो, करोडो लोकांसाठी हिरो आहेत. या देशाचे ते खरे हिरो असल्याचं' विवेकने म्हटलंय.


'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याबाबत सांगण्यात आले होते. याचिकेत निवडणुकीदरम्यान चित्रपट प्रदर्शित केल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने निवडणूक काळात 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. या याचिकेवर निवडणूक आयोगाकडून निर्मात्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. अखेर अनेक वादांनंतर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.


संदीप सिंह आणि सुरेश ओबेरॉय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ओमंग कुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.