`मला आता शक्य होणार नाही,` अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत; PM मोदी म्हणाले `अद्याप...`
बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे चाहत्यांना त्यांची प्रकृतीची चिंता सतावू लागली आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यक्त झाले आहेत.
बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे चाहत्यांना त्यांची प्रकृतीची चिंता सतावू लागली आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यक्त झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमिताभ बच्चन यांना कछमधील रण उत्सवात सहभागी होण्याचं निमंत्रणही दिलं. याशिवाय वडोदरामधील स्टॅच्यू ऑफ युनिटीला तुम्ही भेट देणं अद्याप बाकी असल्याची आठवण नरेंद्र मोदींनी करुन दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपला 81 वा वाढदिवस साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच उत्तराखंडमधील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकांनाही या ठिकाणाला भेट देण्याचं आवाहन केलं. नरेंद्र मोदींच्या सोशल अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले होते. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि देवत्व तुम्हाला मंत्रमुग्ध करेल असं ते म्हणाले होते. अमिताभ बच्चन यांनी एक्स अकाऊंटवर नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. मी कधीच येथे स्वत: जाऊ शकणार नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. अमिताभ बच्चन असं का म्हणाले असावेत याचे वेगवेगळे संदर्भ लावले जात असून, चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये काय?
अमिताभ बच्चन यांनी नरेंद्र मोदींचा पिथौरागढमधील कैलाश व्ह्यू पॉइंटवरील फोटो शेअर केला आहे. सोबत लिहिलं आहे की, येथील धार्मिकता, रहस्य, कैलास पर्वताचे देवत्व यांचं मला बऱ्याच काळापासून कुतूहल आहे. पण शोकांतिका अशी आहे की मी कधीही प्रत्यक्ष भेट देऊ शकणार नाही". यानंतर अनेक नेटकऱ्यांना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटू लागली आहे.
नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "माझी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरांची भेट खरोखरच रमणीय होती. येत्या आठवड्यात रण उत्सव सुरू होत आहे आणि मी तुम्हाला कच्छला भेट देण्याचे आवाहन करतो. तुमची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणंही बाकी आहे".
गुरुवारी 12 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या एक दिवसीय दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पिथौरागढमधील कैलाश व्ह्यू पॉइंटवरून आदि कैलासला भेट दिली. त्यानंतर भारत-चीन सीमेला लागून असलेल्या गुंजी गावात गेले. 14000 फूट उंचीवर हे गाव आहे. नंतर त्यांनी अल्मोडा येथील जागेश्वर धाम येथे दर्शन घेतले. तसंच पंतप्रधानांनी पिथौरागढमध्ये 4200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.