मुंबई : चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माती एकता कपूरचा पाठलाग करणाऱ्या 32 वर्षीय कॅब चालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने गेल्या काही महिन्यांपासून 30हून अधिक वेळा एकता कपूरचा पाठलाग केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुधीर राजेंद्र सिंह असून तो हरियाणातील राहणारा आहे. नोकरीसंबंधी कामासाठी त्याला एकताला भेटायचे होते. त्याला एकताशी मैत्री करायची होती. सुरूवातीच्या काळात एकताने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले परंतु नंतर सतत हा व्यक्ती एकताचा पाठलाग करू लागला. 


काही दिवसांपूर्वी एकता जुहूतील एका मंदिरात गेली असता तिथेही सुधीर एकताचा पाठलाग करत पोहचला. त्यावेळी त्याने एकताशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु एकताच्या खासगी सुरक्षारक्षकाने त्याला अडवले. त्याचवेळी एकताने त्याला दूर राहण्याविषयीही सांगितले होते. त्यानंतर एकताने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. 


आरोपी सुधीरने एकता ज्या जिममध्ये वर्कआउट करते त्या जिमची मेंबरशीपही घेतल्याची माहिती मिळत आहे. एकताने जिममध्ये असताना त्याला अनेकदा आपल्या आजूबाजूला पाहिले होते. गेल्या शनिवारी एकताचा पाठलाग करता करता सुधीरने जिममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली.