मुंबई : शिरोमणी अकाली दल प्रमुख मनजिंदर सिंह सिरसा यांनी बॉलिवूड चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, विकी कौशल आणि वरुण धवन यांच्यासह इतरही काही कलाकारांच्या नावे एक तक्रार दाखल केली आहे. एका जुन्या पार्टीतील व्हिडिओचा आधार घेत त्या पार्टीमध्ये drugs ड्रग्जचा सर्रास वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतक्यावरच न थांबता सिरसा यांनी नार्कोटीक्य कंट्रोल ब्युरो प्रमुख राकेश अस्थाना यांची दिल्लीमध्ये भेटही घेतल्याचं म्हटलं जात आहे. ज्या भेटीमध्ये त्यांनी या तक्रारीबाबत आणि संबंधित सेलिब्रिटींच्या चौकशीबाबत मागणी केल्याचं म्हटलं गेलं. ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आल्याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. 


सिरसा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण उचललेल्या या पावलासंदर्भात माहिती देत काही कागदपत्र सादर केली. ज्यामध्ये त्यांनी करण जोहरच्या घरी बऱ्याच महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीची चौकशी व्हावी यासंदर्भातील बाब अधोरेखित केल्याचं पाहायला मिळालं. 


सिरसा यांनी तक्रार करण्यापूर्वी या पार्टीतील एक व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओमध्ये दिसणारे चेहरे लवकरच एनसीबीच्या कार्यालयाबाहेर रांगेत उभे दिसतील, असं ट्विट करत लिहिलं. इतक्यावरच न थांबता या मंडळींनाही कारागृहात जावं लागू शकतं असे संकेतही त्यांनी या ट्विटमधून दिले होते. तेव्हा आता एनसीबी या मुद्द्यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 




 


दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु असतेवेळी याच प्रकरणाला अनेक वाटा फुटल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये ड्रग्ज कनेक्शनही धक्कादायकरित्या समोर आलं. ज्यानंतर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्याकडून चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. इतकंच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचा सर्रास होणारा वापर या प्रकरणामुळं उघडकीस आला.