Ponniyin Selvan 2 चित्रपटाच्या रक्षिता सुरशेचा गंभीर अपघात, म्हणाली `तो क्षण आठवल्यानंतर माझं अंग...`
Singer Rakshita Suresh Accident: रक्षिता सुरेशचा आज गंभीर अपघात झाला होता. रक्षितानं तिच्या या अपघाताविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बातमी दिली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.
Singer Rakshita Suresh Accident: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी गाणारी गायिका रक्षिता सुरेशने रविवारी तिच्या कारचा भीषण अपघात झाल्याचे सांगितले. रक्षितानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या अपघाता विषयी सांगितले. रक्षिता सध्या मलेशियात आहे तर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं तिची परिस्थिती कशी झाली होती ते सांगितलं आहे. रक्षितानं सांगितलं की ती आता सुखरुप असली तरी तिचा खूप गंभीर अपघात झाला होता. तिला फक्त मुका मार नाही तर त्यासोबत जखमाही झाल्या आहेत.
रक्षिता सुरेशनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत रक्षितानं लिहिलं आहे की 'आज माझा खूप गंभीर अपघात झाला. ज्या गाडीत मी बसले होते, तिचं गाडी पुढे जाऊन डिवायडरला धडकली. मी मलेशियाच्या विमानतळावरून परतण्याची तयारी करत होते. हा अपघात इतका भयानक होता की 10 सेकंदाच्या आत माझं संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आलं. आमचं नशिब चांगलं होतं की गाडीत असलेल्या एअरबॅगनं आम्हाला वाचवलं. जर ते नसतं तर सगळ्या गोष्टी खूप वाईट झाल्या असत्या. मला याचा आनंद आहे की ड्रायव्हर आणि आमच्यासोबत असलेले सगळेच सुखरुप आहेत. फक्त काही छोट्या मोठ्या जखमा झाल्या आहेत. आता सुद्धा मी त्या विचारानं थरथरते. आनंद आहे की वाईट परिस्थिती होती ती गेली आहे.'
हेही वाचा : Prajakta Mali आणि सई ताम्हणकर 'हास्यजत्रे'च्या सेटवर कशा वागतात? शिवाली परबचा खुलासा
रक्षिता विषयी बोलायचं झालं तर तिनं 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटातील Kirunage हे गाणं गायलं आहे. चित्रपटातील पहिल्या भागात देखील तिनं गाणं गायलं होतं. तर रश्मिका 2009 साली प्रदर्शित झालेल्या लिटिल स्टार सिंगर या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. त्याशोनंतर रक्षिताच्या करिअरची सुरुवात झाली होती. रक्षितानं आजवर अनेक गाणी गायली आहेत. दरम्यान, 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटातील रक्षिता ही पहिली नाही जिचा अपघात झाला होता. या आधी या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विक्रमचा देखील अपघात झाला होता. मात्र, विक्रमचा हा अपघात चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरण करत असताना झाला होता. चित्रपटातील अॅक्शन सीन शूट करत असताना त्याचा अपघात झाला होता. त्याच्या बरगड्या तुटल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे रेस्ट करण्यास सांगितले होते.