सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
‘Suicide or Murder?’ असं चित्रपटाला नाव देण्यात आलं आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येला एक आठवडा लोटला नसताना त्याच्या जीवनावर आधारित बायोपिक चाहत्यांच्या भेटीला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या आत्महत्येमागे नक्की कोणतं कारण असेल अशा एक ना अनेक प्रश्नांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शमिक मलिक करणार आहेत.
विजय शेखर गुप्ता यांनी ‘Suicide or Murder?’असं या चित्रपटाला नाव दिलं आहे. या चित्रपटासंदर्भात नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'मुंबई चित्रपट विश्वातील मोठे स्टार आणि प्रॉडक्शन हाऊसची एकाधिकारशाही चालू आहे, ती संपवण्यासाठी मी हा चित्रपट साकारण्याची जबाबदारी हाती घेतली आहे.' असं ते म्हणाले.
सुशांतने ज्या परिस्थितीचा सामना केला आहे. मानसिक तणाव, त्याच्याकडून काढून घेण्यात आलेले चित्रपट अशा सर्व गोष्टींभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. 'हा चित्रपट फक्त एक बायोपिक नसून सुशांतचं जीवन प्रेरित करणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या मध्यमातूम कलाविश्वातील अनेक बारकावे समोर येणार आहेत.' असं वक्तव्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केलं आहे.