आरारारारा.... प्रविण तरडे `त्या` कमेंटमुळे ट्रोल
जेएनयू विद्यार्थ्यांच्या संदर्भात कमेंट
मुंबई : देशभरात जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटत आहेत. ही गोष्ट आता सेलिब्रिटींपर्यंत देखील पोहोचली आहे. याबाबत एका पोस्टवर कमेंट करण अभिनेता प्रविण तरडेला चांगलच महागात पडलं आहे. प्रविण तरडेंच्या विरोधात नेटिझन्सकडून संताप व्यक्त केला जात असून तरडे यांच्या कमेंटवर अनेकांनी नकारार्थी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पत्रकार राजू परुळेकर यांनी फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहीली होती. 'एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा'. परुळेकरांच्या या पोस्टवर अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे याने 'संपूर्ण देश भाजपासोबत', अशी कमेंट केली. या कमेंटवर नेटिझन्सकडून टीकांचा भडीमार सुरू झाला आहे. प्रविण तरडे यांना ट्रोल करण्यात आलं आहे.
प्रविण तरडेंच्या कमेंटवर आतापर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात तरडेंचा समाचार घेणाऱ्या सर्वाधिक प्रतिक्रिया आहेत. संपूर्ण देश भाजपासोबत आहे तर मग आंदोलन करणारे परग्रहावरुन आलेत काय? असा सवाल देखील नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आंदोलनाला बॉलिवूड कलाकारांनी अगदी सुरूवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. आता यामध्ये अनेक कलाकारांची उपस्थिती लागत आहे. अगदी मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने मंगळवारी संध्याकाळी जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.
तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही तुमच्या देशातील विद्यार्थ्यांच संरक्षण करू शकत नाही आणि तुम्ही बाहेरच्या देशाच्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलता' अशी प्रतिक्रिया सोनालीने व्यक्त केली आहे.