`हे येड्या गबाळ्याचं काम नाही`, मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले `इंग्रजीत शिवी दिली तर...`
Pravin Tarde On Marathi Language : प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेवर वक्तव्य केलं आहे. मराठी भाषा ही भावनिक नाही तर जहरी आहे असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडे सध्या त्यांचा `बलोच` या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
Pravin Tarde On Marathi Language : आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिना (Maharashtra Day) निमित्त सगळेच एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेविषयी त्यांचं काय मत आहे ते सांगितलं आहे. जेव्हा कोणी आपल्याला इंग्रजीत शिव्या देतं, तेव्हा आपल्याला राग येत नाही. पण तिची शिवी आपल्याला कोणी मराठीत दिली तर आपला संताप होतो, असं म्हणतं प्रवीण तरडे यांनी मराठी भाषा कशी जीवाभावाची आहे आणि आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते सांगितले आहे.
प्रवीण तरडे यांनी नुकतीच पिंपरी चिंचवडच्या ‘दिशा सोशल फाउंडेशन’ च्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी मराठी भाषेविषयी प्रवीण तरडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे म्हणाले, 'मराठी भाषा ही अशी भाषा आहे जी भावनिक भाषा अजिबात नाही. मराठी भाषा ही भावनिक भाषा अजिबातच नाही, त्यामुळे आपल्या भाषेतल्या शिव्या देखील जिव्हारी लागतात. जेव्हा कोणी आपल्याला इंग्रजीत शिव्या देतं, तेव्हा आपल्याला राग येत नाही. पण तिची शिवी आपल्याला कोणी मराठीत दिली तर आपला संताप होतो.'
पुढे प्रवीण तरडे म्हणाले, असं आपल्याला वाटतं त्याच कारण हे आहे की आपली भाषा ही जहरी आहे. आपली भाषा ताकदवान आहे. मराठी भाषा येणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषांमध्ये गणली गेलीच पाहिजे आणि आजही गणली जाते. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही भाषा बोलत होते. त्याचवेळी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास स्वामी हे देखील हीच भाषा बोलत होते. प्रत्येकाची भाषा बोलण्याची पद्धत वेगळी होती.'
हेही वाचा : A R Rahman च्या कॉन्सर्टवर पुणे पोलिसांची कारवाई! जाणून घ्या नेमकं काय घडलं?
दरम्यान, सध्या प्रवीण तरडे हे त्यांचा ‘बलोच’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे या सिनेमात पाहायला मिळतील. शिवाय त्याठिकाणी काय भयाण वास्तवाला त्यांना सामोरे जावे लागले याचे चित्रण 'बलोच'मध्ये असणार आहे. 'बलोच' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन यांनी केले आहे. लवकरच प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ आणि ‘धर्मवीर २’ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत.