कोरोनाने माझा धडधाकट जिवाभावाचा मित्र खाल्ला.... प्रविण तरडेंची भावूक पोस्ट
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहेत.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर केलं आहे. या दुसऱ्या लाटेतही अनेकांनी आपल्या जवळच्या मंडळींना गमावलं आहे. कोरोना अगदी काही दिवसांत होत्याचं नव्हतं करतो. याचा प्रत्यय अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडे यांना आला आहे. प्रविण तरडेंनी आपल्या जीवाभावाचा मित्र गमावला आहे.
अभिनेता अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. निर्व्यसनी, दररोज व्यायाम करणाऱ्या अमोलचा कोरोनाने बळी घेतला आहे. अगदी 15 दिवसांत कोरोनाने माझ्या मित्राला खाल्ला, असं म्हणतं प्रविण तरडे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
प्रविण तरडेंनी शेअर केलं दुःख
माझा मित्र अमोल धावडे गेला... कोरोनाने आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात खाल्ला .. किती आठवणी ..? १९९६ साली मी लिहिलेल्या "आणखी एक पुणेकर " या एकांकीकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणुन , माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच .. देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच .. ११ मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्ता पर्यन्त त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅाग ने सुरू करायचो .. हा माझा एक श्रध्देचा भाग होता.. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा .. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा .. एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या , सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास .. तुझा शेवटचा मेसेज होता " बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव " राहिलाच शेवटी .. डोळ्यातील पाणी थांबत नाही ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला “सुखी जीव “ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा
माझा मित्र अमोल धावडे गेला .. कोरोनाने आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात...
Posted by Pravin Vitthal Tarde on Sunday, April 25, 2021
दुसऱ्या लाटेने राज्याला खूप मोठा फटका बसला आहे. या काळात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने अगदी आरोग्य यंत्रणेला देखील कोलमडून टाकले आहे. राज्यात कोरोनाचे ६६,१९१ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर ६१,४५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,९८,३५४ सक्रिय रुग्ण आहेत. पण आज राज्यात ८३२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.