अलका कुबल - प्रिया बेर्डे अडचणीत, 10 वर्षांपुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार लाखोंचा दंड
सध्या बरेच कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत.
मुंबई : सध्या बरेच कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. एकीकडे जॅकलिन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे मराठमोळे कलाकारही चर्चेत आहेत आणि आता यातच समोर आलेली नावं म्हणजे दिग्दज अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे... यामागचं कारण म्हणजे, कोल्हापूर येथे २०१५ साली मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मराठी चित्रपट महामंडळातर्फे पार पडलेला मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम.
या कार्यक्रमात तक्रार केल्यानंतर वायफळ खर्च केला जत असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अहवालातही उल्लेख करण्यात आला आहे. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चाविरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल त्यावेळी संचालक पदी कार्यरत होते. तक्रारीनंतर या खर्चाची भरपाई करण्याचा आदेश सहआयुक्तांनी जानेवारी २०१९ मध्ये दिला होता. मात्र या निर्णयानंतर संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीृ होती
मात्र हाय कोर्टात धाव घेणाऱ्या कलाकारांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाने ही वाढीव रक्कम सहा आठवड्यात भरण्याचे आदेश दिले आहेत. मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर. तसेच सुभाष भुरके, इम्तियाज बारगिर, सदानंद सूर्यवंशी अशा अनेक जणांवर हा वाढीव खर्चाचा भार पडला.
या सर्वांना ही रक्कम सहा आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मानाचा मुजरा हा कार्यक्रम २०१५ साली पार पडला होता. या कार्यक्रमात हा आर्थिक घोटाळा झाला असल्याचं उघडकीस आलं होतं. या काळात १० लाख रुपये विनाकारण खर्च झाला असल्याचंही तक्रारदारांचं म्हणणं होतं. या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, रणजित जाधव यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली होती.
या कार्यक्रमासाठी संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते ज्यावर सभासदांनी आक्षेप घेत या चुकीच्या खर्चाची चौकशी तसंच वसुली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी १० लाख ७८ हजार रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला. पण याला संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण त्यांची याचिका फेटाळून लावत ती रक्कम सहा आठवड्यात भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे प्रिया बेर्डे, अलका कुबल, विजय पाटकर यांच्यासह अनेक सदस्य अडचणीत सापडले आहेत.