मुंबई : 'डेली सोप क्वीन' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकता कपूर हिने काही महिन्यांपूर्वी मातृत्वाच्या नव्या विश्वात पदार्पण केलं. सरोगसीच्या माध्यमातून तिने एका मुलाचं संगोपन करण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे ज्याप्रमाणे एक निर्माती म्हणून ती यशस्वी ठरत आहे, त्याचप्रमाणे एक आई म्हणूनही ती काही ठाम आणि महत्त्वाचे निर्णय घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलाला म्हणजेच रवी कपूर याला क्षणार्धासाठीही नजरेआड होऊ न देण्याचा एकताचा अट्टहास. त्यामुळे तिने कामाच्या ठिकाणी 'क्रेच' म्हणजे लहान मुलांचं संगोपन करता येण्याजोग्या सुविधांची सोय करुन घेतली आहे. 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने मातृत्वाच्या या नव्या इनिंगविषयी तिने माहिती दिली. 


'सध्याच्या घडीला आयुष्य म्हणजे जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासोबत व्यतीत करणं. हल्ली मी कामाच्या ठिकाणहून नेहमीपेक्षा लवकर निघण्याचा प्रयत्न करते. मी रवीलाही ऑफिसमध्ये नेहमीच आणत असते' असं ती म्हणाली. या प्रवासात आपले सहकारी आणि आई यांचा पाठिंबा आणि त्यांचा मोठा आधार मिळत असल्याचंही तिने न विसरता नमूद केलं. 'जेव्हा केव्हा मी एखाद्या कामात व्यग्र असेन तेव्हा हीच मंडळी माझ्या मुलाची काळजी घेतात, त्यांच्याकडे लक्ष देतात', हेसुद्धा तिने न विसरता सांगितलं. 



कामाच्याच ठिकाणी एकाच वेळी काम आणि मातृत्व अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी म्हणून एकताने क्रेच ची व्यवस्था केली. रवी मोठा झाल्यानंतरही हे क्रेच किंवा लहान मुलांच्या संगोपनाच्या या सुविधा कायम तशाच राहतील. कारण, काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने त्यांच्या मुलांच्या सभोवती असणंही तितकंच महत्त्वाचं असल्याची बाबही तिने यावेळी अधोरेखित केली. ही सुविधा खरंतर फार आधीच वापरात आणणं अपेक्षित होतं, ज्यामुळे या दिरंगाईकरता एकताने खंतही व्यक्त केली.