जामीन मिळूनही अल्लू अर्जुनला पुन्हा का जावं लागलं कोर्टात? काय आहे नेमकं प्रकरण?
अल्लू अर्जुनला पुष्पा 2 च्या प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी नामपल्ली कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे. अशातच आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन कोर्टात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Allu Arjun : साउथ अभिनेता अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबादच्या नामपल्ली कोर्टात हजर झाला आहे. न्यायालयाने अल्लू अर्जुनला या प्रकरणी 03 जानेवारी रोजी नियमित जामीन मंजूर केला होता. आता यासंदर्भात त्याला दुसऱ्या दिवशी न्यायालयात यावे लागले आहे. जिथे त्याला कागदोपत्री कामे करावी लागली. नियमित जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुनला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करून ती न्यायालयात सादर करायची होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुपरस्टारला आज कोर्टात यावे लागले होते.
सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे कोर्टाबाहेरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अल्लू अर्जुन काळ्या शर्टमध्ये दिसत आहे. न्यायालयातील काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी तो कोर्टात पोहोचला होता. कारमधून खाली उतरून तो थेट कोर्टात प्रवेश करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा कोर्टाबाहेरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन कोर्टातून बाहेर येताच एक चाहता त्याच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी आला. त्यानंतर अल्लू अर्जुनने नम्रपणे त्या चाहत्याला असे करण्यापासून मनाई केली आणि तो त्याच्या गाडीमध्ये बसून निघून गेला. यादरम्यान तो आपल्या वकिलाशी हस्तांदोलनही करताना दिसला.
अभिनेत्याला नामपल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर
अभिनेता अल्लू अर्जुनला 4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. न्यायालयाने त्याला काही अटींवर हा जामीन मंजूर केला आहे. याशिवाय, प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन आणि तसेच 50,000 वैयक्तिक बाँड जमा करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात अभिनेत्याच्या वकिलाने सांगितले की, न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत अभिनेत्याला जामीन मंजूर केला. तथापि, काही अटी आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याला दोन महिने किंवा आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल. तो तपासात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही. असं त्याच्या वकिलांनी सांगितले.